Pune News: पुणे-लोणावळा लोकल सुरू करण्यासाठी राज्य शासनाकडून ग्रीन सिग्नल

एमपीसी न्यूज – कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर काही निर्बंधांसह पुणे परिसरातील लोकल ट्रेन सुरू करण्यास राज्य शासनाने परवानगी दिली आहे. मिशन बिगिन अंतर्गत जारी करण्यात आलेल्या आदेशात यासंदर्भातील उल्लेख आहे. 

मुंबई महानगर क्षेत्राच्या धर्तीवर पुणे क्षेत्रातील लोकल ट्रेन सुरू करण्यास राज्य शासनाने परवानगी दिली आहे. त्यासाठी नोडल ऑफिसर म्हणून पुण्याच्या पोलीस आयुक्तांची नियुक्ती करण्यात आली आहे.

राज्य शासनाने अनलॉक 5 ची नियमावली नुकतीच जाहीर केली आहे. मिशन बिगेन अंतर्गत अनलॉक 5 हा 31 ऑक्टोबर पर्यंत असणार आहे. दरम्यान या कालावधीत काही बाबी सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे.

पुणे रेल्वे विभागातील लोकलसेवा सुरू करण्यास राज्य शासनाने परवानगी दिली आहे. यामुळे पुणे लोणावळा या लोहमार्गालगत राहणाऱ्या लोकांसाठी ही दिलासादायक बाब आहे. राज्य शासनाने लोकल सुरू करण्यासाठी ग्रीन सिग्नल दिला आहे. मात्र लोकल सेवा कधीपासून सुरू होणार याबाबत रेल्वे विभागाकडून अद्याप सांगण्यात आले नाही.

राज्य शासनाने अनलॉक 5 ची नियमावली आणि आदेश जाहीर केले आहेत. हा अनलॉक 5 हा 1 ते 31 ऑक्टोबर पर्यंत राहणार आहे. यामध्ये राज्यातील लांब पल्ल्याच्या रेल्वे देखील सुरू करण्यास शासनाने परवानगी दिली आहे.

पुण्यातील लोकलसेवा सुरू करतानाच कोरोनाच्या अनुषंगाने काळजी, खबरदारी घेण्याचे देखील आदेश देण्यात आले आहेत. पुणे पोलीस आयुक्त नोडल ऑफिसर म्हणून काम पाहणार असल्याचेही आदेशात म्हटले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.