Pune News : लोहगाव-धानोरीला शनिवारपासून मिळणार भामा आसखेडचे पाणी

एमपीसी न्यूज : बहुप्रतिक्षित भामा आसखेड पाणी पुरवठा योजनेतून शनिवार पासून दि.9 डिसेंबर पूर्व भागाला पाणी पुरवठा सुरू होणार आहे. त्यामुळे आता लोहगावकारांना आठ दिवसांऐवजी तीन दिवसांनी पाणी मिळेल अशी माहिती आमदार सुनील टिंगरे यांनी एमपीसी न्यूजला दिली.

भामा आसखेड पाणी पुरवठा योजनेच्या पाणी पुरवठ्याच्या वितरणाबाबत वडगाव शेरीचे आमदार सुनील टिंगरे यांनी महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांसमवेत बैठक घेऊन आढावा घेतला.

या बैठकीला पाणी पुरवठा विभागाचे प्रमुख अधिक्षक अभियंता अनिरुद्ध पावसकर, कार्यकारी अभियंता नंदकिशोर जगताप, मनिषा शेकटकर, सुदेश कडू, विनोद क्षीरसागर यांच्यासह अनेक अधिकारी उपस्थित होते.

या बैठकीत झालेल्या चर्चेनुसार शनिवारपासून भामा आसखेडचे प्रत्यक्षात नागरिकांना मिळण्यास सुरवात होणार आहे. तीन टप्यात या पाणी पुरवठ्याचे नियोजन प्रशासनाने केले आहे.

त्यानुसार पहिल्या टप्यात आजपासून संपूर्ण धानोरी आणि लोहगाव भागाला पाणी मिळणार आहे. दुसऱ्या टप्प्यात विश्रांतवाडी आणि विमाननगर भागाला पाणी पुरवठा केला जाईल. सद्य:स्थितीत लोहगाव भागात सर्वाधिक पाणी टंचाई असून आता आठ दिवसांनी पाणी मिळत आहे. हा कालावधी तीन ते चार दिवसांवर येईल. त्यानंतर तिसऱ्या टप्यात फुलेनगर, प्रतिकनगर, नागपूर चाळ, हाऊसिंग बोर्ड या भागाला पाणी पोहचेल आणि शेवटच्या येरवडा, टिंगरेनगर, कळस यासह उर्वरित भागाला पाणी मिळेल अशी माहिती आमदार टिंगरे यांनी दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.