Pune News : महाविकास आघाडीने पुण्याला सावत्र वागणूक दिली; आमदार शिरोळे यांचा आरोप

एमपीसी न्यूज – शिवसेनेच्या नियंत्रणाखाली असलेल्या मुंबईला कोरोना निर्बंधांमध्ये सवलत देताना महा विकास आघाडीने पुण्याला सावत्र वागणूक दिली, असा आरोप भाजपचे आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी पत्रकाद्वारे केला आहे.

महाविकास आघाडी सरकार कोरोना निर्बंधांच्या पार्श्वभूमीवर राजकारण करीत आहे. यामुळे पुण्यातील नागरिकांची, व्यावसायिकांची रोजीरोटी धोक्यात येत आहे. पुणे शहरामध्ये मागील 8 आठवड्यांपासून कोरोना पॉझिटिव्हीटी दर 4 टक्क्यांपेक्षा कमी असूनही निर्बंध जैसे थे ठेवले आहेत. याच वेळी शिवसेनेच्या नियंत्रणाखालीलं मुंबईला कोरोनाच्या निर्बंधात शिथिलता देण्यात आली आहे. आणि महाविकास आघाडीने पुण्याला पुन्हा एकदा सावत्र वागणूक दिली आहे, असे आमदार शिरोळे यांनी पत्रकात म्हटले आहे.

या अगोदर अनलॉक करताना पुणे शहर, पिंपरी चिंचवड शहर आणि पुणे जिल्हा स्वतंत्र मानले गेले.परंतु यावेळी कोरोना पॉझिटिव्हीटी दराची चुकीची मांडणी करून पुणे आणि पिंपरी चिंचवड शहर आणि जिल्हा एकत्र करून राज्य सरकारने पुणेकरांवर अन्याय केला आहे. शहरात 22 लाख नागरिकांचे लसीकरण पूर्ण झालेले आहे, जम्बो कोविड केअर सेंटरमध्ये शून्य रुग्ण आहेत, मग पुण्यातीलं निर्बंधामध्ये शिथिलता देण्याबाबत आघाडी सरकार राजकारण का करीत आहे, असा सवाल आ. शिरोळे यांनी केला आहे.

कोरोना साथीच्या काळात पुणेकरांनी बरेच सहन केले आहे. मुख्यमंत्र्यांकडून पुण्याकडे सतत दुर्लक्ष होत असतानाही शहर पहिल्या लाटेतून सावरले. आणि सध्या उंच भरारी घेण्याच्या स्थितीत आले आहेत अशावेळी त्यांचे पंख छाटू नका, असे आवाहन आ. शिरोळे यांनी आघाडीतील मंत्र्यांना केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.