Pune News : मल्टीमोडल ट्रान्झिट हबच्या उत्पन्नातील 50 टक्के हिस्सा देणे महामेट्रोला बंधनकारक

महापालिकेच्या अभिप्रायाला स्थायीची मंजुरी

एमपीसी न्यूज : स्वारगेट येथील एसटी स्टँडच्या जागेत प्रस्तावित मल्टीमोडल ट्रान्झिट हबमधून येणाऱ्या उत्पन्नातील 50 टक्के हिस्सा देणे महामेट्रोला बंधनकारक असणार आहे. तसेच वाणिज्य वापरातील बांधकामातील 50 टक्के हिस्सा देखील पुणे महापालिकेला देणे बंधनकारक असणार आहे.

पुणे महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांचा महामेट्रोला सादर करण्यासाठीचा अभिप्राय स्थायी समितीसमोर मान्यतेसाठी आला होता. त्याला मान्यता दिल्याची माहिती स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने यांनी पत्रकार परिषदेत दिली.

स्वारगेट येथील सद्य:स्थितीतील एसटी बसस्टँड आणि कालव्या शेजारील 28 हजार चौरस मीटर क्षेत्रात महामेट्रो बहुमजली प्रस्तावित मल्टीमोडल ट्रान्झिट हब उभारण्यात येणार आहे. मेट्रो सुरू झाल्यानंतर संचलनाच्या एकूण उत्पन्नातील 50 टक्के हिस्सा पुणे महापालिकेला द्यावे लागणार आहे.

तसेच बहुमजली हबमधील वाणिज्य वापरातील उत्पन्नातून देखील 50 टक्के वाटा पुणे महापालिकेला द्यावे लागणार आहेत. तसा रितसर ठराव स्थायी समितीने मंजूर करून घेतला आहे.

त्यावर महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांच्याकडून अभिप्राय मागविला होता. तो सकारात्मक आल्यामुळे त्याला स्थायी समितीने मंजुरी दिल्याचे अध्यक्ष रासने यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.