Pune News : ‘महाराष्ट्राला कोरोना लसीचे 19 लाख डोस मिळणार’

खासदार गिरीश बापट यांच्या मागणीवर केंद्रीय आरोग्य मंत्री हर्ष वर्धन यांचे आश्वासन

0

एमपीसीन्यूज   : महाराष्ट्रात कोरोनाचा उद्रेक झाल्याने पुणे शहरातील लसीकरणाची मोहीम अधिक गतिमान करावी व किमान आठवडाभर पुरेल एवढा प्रतिबंधक लसीचा पुरवठा करावा,  अशी मागणी खासदार गिरीश बापट यांनी आज केंद्रीय आरोग्य मंत्री हर्ष वर्धन यांच्याकडे केली. त्यावर  महाराष्ट्राला कोविडचे 19 लाख 50 हजार डोस दिले जातील, असे आश्वासन हर्ष वर्धन यांनी दिल्याची माहिती  खासदार गिरीश बापट यांनी सोशल मीडियावरून दिली. 

राज्यात सध्या कोरोना प्रतिबंधक  लसीचा तुटवडा आहे. लस नसल्यामुळे अनेक लसीकरण केंद्र बंद करण्याची वेळ  राज्य सरकारवर आली आहे. तर दुसरीकडे केंद्र सरकार महाराष्ट्राला सापत्न वागणूक देत असल्याचा आरोप महा विकास आघाडी सरकारकडून केला जातोय. त्यामुळे गिरीश बापट यांनी केंद्रीय आरोग्य मंत्री यांची घेतलेली भेट महत्त्वाची मानली जाते.

पुणे महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी आज केवळ 25000 लसीचे डोस शिल्लक असल्याचे सांगितले होते. त्यामुळे केंद्र सरकारकडून जर हे 19 लाख 50 हजार लसीचे डोस   लवकर मिळाले तर लसीकरणाचा कार्यक्रम पुन्हा एकदा वेगाने होण्यास मदत होणार आहे.

दरम्यान गिरीश बापट यांनी आपल्या फेसबुकवर लिहिलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे,  पुणे जिल्ह्यात सुमारे साडेदहा हजार कोविडचे रुग्ण सापडले. ही संख्या चिंताजनक असून महाराष्ट्रातील आजची सर्वाधिक रुग्ण संख्या आहे.

_MPC_DIR_MPU_II

या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने प्रतिबंधक लस देण्याची मोहीम अधिक गतिमान करावी तसेच रुग्णालयातील बेडसची संख्या वाढवण्यासाठी मदत करावी, असे निवेदन आज मी केंद्रीय  आरोग्य मंत्री हर्ष वर्धन यांना दिले. पुण्यात सरासरी दररोज पंचवीस हजार नागरिक लस टोचून घेतात. तथापि शहराला दर आठवड्याला सुमारे दोन लाख  इतकी लस गरजेची आहे.

लसीचा पुरवठा कमी झाल्याने या मोहिमेवर परिणाम झाला आहे. या पार्श्वभूमीवर शहरातील खाजगी रुग्णालयांना लस देण्याची परवानगी द्यावी, अशी आमची मागणी आहे. याबाबतचा प्रस्ताव केंद्राकडे यापूर्वीच पाठविण्यात आला आहे.

शहरातील अशा 215 खाजगी रुग्णालयात लसीकरण करता येईल. त्या रुग्णालयाची यादीही आम्ही सादर केली आहे. तसेच दुर्धर आजाराने ग्रस्त व अंथरुणाला खिळून असलेल्या वृद्ध नागरिकांसाठी मोबाईल लसीकरण व्हॅन सुरू करण्याची परवानगी पुणे महापालिकेला देण्यात यावी, याकडे मी आरोग्य मंत्र्यांचे लक्ष वेधले.

कोविड लसीकरणाकरिता खाजगी रूग्णालयांना परवानगी मिळवणे ही प्रक्रिया अतिशय क्‍लिष्ट आहे. ती सुलभ करून लसीकरणाचे प्रमाण वाढवावे. तसेच वेंटीलेटरची संख्या वाढवावी यासाठी मी केंद्राकडे  आग्रह धरला, असल्याचे खासदार बापट यांनी म्हटले आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

_MPC_POSTEND_MAT_1
Leave a comment