Pune News : गणपती बाप्पांच्या कृपेने महाराष्ट्र लवकरच कोरोनामुक्त होईल – अजित पवार

उपमुख्यमंत्री पवार यांनी गणेशोत्सवानिमित्त राज्यातील जनतेला शुभेच्छा दिल्या .

एमपीसी न्यूज – बाप्पांच्या आगमनानं घराघरात आनंद, उत्साह, चैतन्याचं, भक्तीचं वातावरण निर्माण झालं आहे. भक्तीमय वातावरणात साजरा होत असलेला यंदाचा गणेशोत्सव कोरोनाप्रतिवबंधक नियमांचं पालन करुन साजरा होईल. श्री गणरायांच्या आशिर्वादाने संपूर्ण महाराष्ट्र लवकरंच कोरोनामुक्त होईल, असा विश्वास उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केला आहे.

उपमुख्यमंत्री पवार यांनी गणेशोत्सवानिमित्त राज्यातील जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत.

उपमुख्यमंत्री आपल्या शुभेच्छा संदेशात म्हणतात की, कोरोना संकटामुळे गणेशभक्तांनी घरगुती व सार्वजनिक गणेशोत्सव यंदा गर्दी टाळून, सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळून साधेपणानं साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे.

सामाजिक जाणीवेतून गणेशोत्सव साधेपणानं साजरा होत असला तरी, आनंद, उत्साह, भक्तीमध्ये जोश कायम आहे. त्यात उणीव नाही.

बुद्धीची देवता असलेल्या श्री गणरायाच्या समस्त भक्तांनी श्री गणेशोत्सवासंदर्भात घेतलेल्या कौतुकास्पद निर्णयामुळे राज्यातील कोरोनाचा संसर्ग रोखला जाईल तसंच श्री गणपती बाप्पांच्या कृपेने महाराष्ट्र लवकर कोरोनामुक्त होण्यास मदत होईल, असा मला विश्वास आहे.

गणेशोत्सव काळात सुरक्षिततेची काळजी घेण्याचं आवाहनही उपमुख्यमंत्र्यांनी सर्वांना केलं आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.