Pune News : महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेचा लाभ न देणाऱ्या रुग्णालयांची योजनेची मान्यता रद्द करण्याची शिफारस करणार – जिल्हाधिकारी

एमपीसी न्यूज : महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेचा कोविड रुग्णांना लाभ न देणाऱ्या रुग्णालयांची या योजनेची मान्यता रद्द करुन त्याऐवजी अन्य रुग्णालयांचा समावेश करण्याची शिफारस राज्य आरोग्य हमी सोसायटीकडे करण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी सांगितले.

महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेची आढावा बैठक जिल्हाधिकारी डॉ. देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात घेण्यात आली, यावेळी ते बोलत होते.

महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेंतर्गत कामकाजाचा सविस्तर आढावा घेऊन जिल्हाधिकारी डॉ. देशमुख म्हणाले, जिल्ह्यातील कोविड व नॉन कोविडच्या हजारो रुग्णांना आतापर्यंत या योजनेचा लाभ मिळाला आहे. काही रुग्णालये योजनेचा लाभ मिळवून देण्यात टाळाटाळ करत असल्याचे आढळून येत आहे. या योजनेचे काम न केल्यामुळे मान्यता रद्द करण्यात येणाऱ्या रुग्णालयांची चौकशी करुन जिल्हा प्रशासनाकडे अहवाल सादर करा, अशा सूचना जिल्हाधिकारी डॉ देशमुख यांनी दिल्या. अधिकाधिक रुग्णांना योजनेचा लाभ मिळवून देणाऱ्या रुग्णालयांच्या कामाचे कौतुक करुन अशा रुग्णालयांना प्रोत्साहन द्यावे, असेही त्यांनी इंडियन मेडिकल असोसिएशन व समिती सदस्यांना सांगितले.

महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेचा लाभ देण्यात येणारी रुग्णालये व त्यांनी रुग्णांना दिलेला लाभ यांची  आकडेवारी, आतापर्यंतचे एकूण लाभार्थी याबाबतची माहिती घेवून जिल्हाधिकारी डॉ. देशमुख म्हणाले, महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेचा लाभ जास्तीत जास्त  रुग्णांना मिळवून देण्यासाठी समितीने प्रभावीपणे काम करावे. या कामी इंडियन मेडिकल असोसिएशनचे सहकार्य महत्वाचे आहे. समाजात डॉक्टरांना मानाचे स्थान दिले जाते. डॉक्टरांनीही समाजासाठी सेवाभावी वृत्तीतून आरोग्य सेवा द्यायला हवी,असेही त्यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.