Pune News : महाविकास आघाडी सरकारला आरक्षण टिकविता आले नाही : विनायक मेटे

एमपीसी न्यूज : फडणवीस सरकारने मराठा समाजाला दिलेले आरक्षण महाविकास आघाडी सरकारला टिकविता आले नाही. मग शिवाजी पार्कवरून सर्व समाजांना न्याय देण्याच्या पोकळ घोषणा कशाला करता? तुमच्या ‘टॅगलाइन’प्रमाणे काहीतरी करून दाखवा,’ असा खोचक टोला शिवसंग्रामचे अध्यक्ष विनायक मेटे यांनी सोमवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लगावला.

म्हात्रे पुलानजिक कृष्णसुंदर लॉन्स येथे शिवसंग्राम संघटनेचे नोकरभरतीमध्ये नियुक्त झालेल्या पण रूजू न केलेल्या उमेदवारांचा मेळावा संपन्न झाला. सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाला स्थगिती देण्यापूर्वी विविध सरकारी, निमसरकारी विभागांच्या नोकरभरतीत निवडल्या गेलेल्या साडेतीन ते चार हजार उमेदवारांना रुजू करून घेण्यास सरकारने नकार दिला आहे. या उमेदवारांच्या समस्यांना वाचा वाचा फोडण्यासाठी हा मेळावा आयोजित केला होता.

त्यानंतर पत्रकारांशी बोलताना मेटे म्हणाले, ‘सर्वोच्च न्यायालयाने 9 सप्टेंबर रोजी मराठा आरक्षणाला अंतरिम स्थगिती दिली. मात्र, या निर्णयाचा चुकीचा अर्थ लावून विविध शासकीय, निमशासकीय विभागाच्या नोकरभरतीत निवडल्या गेलेल्या साडेतीन ते चार हजार उमेदवारांना नोकरीपासून वंचित ठेवण्याचे षडयंत्र मंत्रालयातील काही मंत्री व वरिष्ठ सचिवांनी रचले असून, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे त्याला बळी पडत आहेत,’ असा आरोपही त्यांनी केला.

मुख्यमंत्र्यांना कायदेशीर नोटीस बजावणार –
मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण काँग्रेसच्या काही लोकांना हाताशी धरून मराठा समाजात दुफळी माजविण्याचे काम करत आहेत, असा आरोपही विनायक मेटे यांनी केला. आरक्षणाला स्थगिती मिळण्यापूर्वी नोकरभरतीत निवडलेल्या उमेदवारांना रुजू करून घेण्यासंदर्भात सरकारने तातडीने बैठक बोलवावी, यासाठी मुख्यमंत्री, अशोक चव्हाण आणि मुख्य सचिवांना कायदेशीर नोटीस बजावणार आहोत, तसेच राज्यपालांकडे दाद मागणार आहोत. त्यानंतरही न्याय न मिळाल्यास आझाद मैदानावर धरणे आंदोलन करू, असा इशाराही मेटे यांनी यावेळी दिला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.