Pune News: महाविकास आघाडीकडून ‘बार्टीला’ अत्यल्प निधी – अमित गोरखे

एमपीसी न्यूज – बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी)ला निधी कमी पडू दिला जाणार नसल्याचे घोषणा राज्य सरकारने केल्या. परंतु, प्रत्यक्षात अत्यल्प निधी मंजूर केला. महाविकास आघाडी सरकार तसेच सामाजिक न्याय मंत्र्यांची भूमिका अनुसूचित जाती विरोधात असल्याचा आरोप भाजपचे प्रदेश सचिव अमित गोरखे यांनी केला.

गोरखे म्हणाले, राज्यभरात रोष निर्माण झाल्यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) ला अर्थसंकल्पात तरतूद केलेल्या 300 कोटींपैकी केवळ 91.50 कोटी रुपये निधी वितरित करण्यात आला. बार्टीमार्फत राबविण्यात येणाऱ्या कोणत्याही योजनेला निधी कमी पडू दिला जाणार नाही, अशी खोटी घोषणा सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे केली. परंतु, अल्प तरतूद करुन आघाडी सरकारने आपली अनास्था स्पष्ट केली. तरतूद कमी केल्याचा तीव्र निषेध करतो. अत्यल्प निधी मंजूर करणारा अर्थ विभाग व सामाजिक न्याय मंत्र्यांची भूमिका अनुसूचित जाती विरोधात आहे.

बार्टी मार्फत राबविण्यात येणाऱ्या प्रशिक्षण कार्यक्रम व कार्यशाळा आदींसाठी 90 कोटी रुपये तसेच महाड येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय स्मारक देखभाल समिती साठी दीड कोटी असे एकूण 91.50 कोटी रुपये आज स्वतंत्र शासन निर्णयाद्वारे वितरित करण्यात आले आहेत. गेली सहा महिने बार्टीच्या योजनांची दुरावस्था केली जात आहे. त्यामुळे अनुसूचित जाती मध्ये अस्वस्था आहे. बार्टीची प्रत्येक योजना तळागाळातील अनुसूचित जाती घटकांतील विद्यार्थ्यांच्या कल्याणासाठी आहे. यापैकी कोणतीही योजना बंद पडणार नाही, याची काळजी ठाकरे सरकारने घेणे गरजेचे आहे.

अनुसूचीत जातीसाठीचा सर्व निधी, सर्व महामंडळाचा निधी या सरकारने ताबडतोब द्यावा. नाही तर राज्यभर याचे पडसाद उमटतील, असा इशारा भाजप प्रदेश सचिव अण्णाभाऊ साठे महामंडळाचे माजी अध्यक्ष अमित गोरखे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिला आहे .

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.