Pune News : महापालिकेच्या आगामी निवडणुका महाविकास आघाडी एकत्र लढविणार : संजय राऊत

एमपीसी न्यूज : राज्यात एकत्र आहोत त्यामुळे एकत्र लढणं राज्याच्या हिताचे आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेसह महापालिकेच्या निवडणुका देखील महाविकास आघाडी एकत्र लढविणार आहोत. निवडणुका एकत्र लढण्यावर आम्ही तिन्ही पक्षाचे नेते चर्चा करतोय, असे स्पष्ट संकेत शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी दिले.

पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या वतीने ज्येष्ठ शिवसेना नेते, ‘सामना’चे संपादक, खा.संजय राऊत यांचा पत्रकारांशी वार्तालाप आयोजित केला होता.

यावेळी खासदार राऊत म्हणाले, महाराष्ट्राच्या राजकारणाचा केंद्रबिंदू पुणेच आहे. बाळासाहेब होते तेव्हा मुंबई होते. आता सर्व प्रमुख नेते पुण्यातच आहेत. हे सरकार होणारच होतं. 15 दिवसात काही महिन्यात सरकार कोसळेल असे म्हटले पण सरकार कोसळलं नाही.

मुख्यमंत्री उद्धवजींच्या नेतृत्वाखाली कोरोनाची लढाई चांगली लढलो. अन्य राज्याच्या तुलनेत महाराष्ट्रात उत्तम वैद्यकीय व्यवस्था आहे. मुख्यमंत्री ठाकरेंनी आरोग्याच्या संकटाशी लढताना स्वत: नेतृत्व केले. त्यामुळे तुलनेने आपली हानी कमी झाली, अराजक निर्माण झालं नाही, असे स्पष्टीकरण त्यांनी केले.

तीन पक्षाच्या सरकारपुढे अनेक आव्हानं आहेत. आव्हानं सरकारपुढे नाही तर राज्यापुढे निर्माण करतात. केंद्राला वाटतं विरोधी पक्ष राहूच नये. राज्यात सक्षम विरोधी पक्ष असावा ही आमची भूमिका आहे. स्व.यशवंतराव चव्हाणांपासून विरोधी पक्ष , पक्षनेता असावा ही विचारसरणी आहे.

दुर्दैवाने जे आपल्या विचारांचे नाहीत ते असूच नये ही विचारसरणी देशाला लोकशाहीला घातक आहे. राजकीय दहशतवादाविरोधात सर्वांनी एकजुटीने उभं राहणं गरजेचं आहे, असे आवाहनही खासदार राऊत यांनी केले.

संपूर्ण देशाचं लक्ष बिहारच्या निवडणुकीवर आहे. त्या निवडणुका पारदर्शक होतील अशी अपेक्षा आहे. एक मुलगा ज्याचं कुटुंब तुरूंगात, पण लाखोंच्या सभा घेतोय. तेजस्वी यादव मुख्यमंत्री झाले तर आश्चर्य वाटायला नको. मोफत कोरोना लस देण्याच्या लोकप्रिय घोषणा दिल्यानंतर निवडणूक आयोग त्यावर आक्षेप घेत नाही. यावरून निवडणूक आयोग ही बीजेपीची ब्रँच आहे, असं माझं स्पष्ट आहे, अशी बोचरी टिका त्यांनी यावेळी केली.

युतीच्या सत्ताकाळात बाळासाहेब ठाकरे सरकार चालवतात, असा आरोप केला जात होता. एका पेक्षा जास्त पक्ष असतील तर ज्येष्ठ नेत्याचे मार्गदर्शन घेतले जाते. नरेंद्र मोदी देखील अनेक जणांना सल्ला देतात. शरद पवार सर्वात अनुभवी, सयंमी नेते आहेत. त्यांच्या अनुभवाचा फायदा घेतला नाही तर आम्ही करंटे ठरू.

राज्यपालांनी सर्वांना पंतप्रधान, राष्ट्रपतींकडे पाठवले पाहीजे. जर राज्यपालांना पवार साहेबांचे मार्गदर्शन हवे असेल तर मी त्यांचा निरोप पवार साहेबांकडे पोचवेन, असा खोचक टोलाही त्यांनी लगावला.

मराठा ओबीसी आरक्षणावरून वातावरण गरम करून सामाजिक एकता बिघडवू नये

भाजपचे ज्येष्ठ नेते छत्रपती आहेत. त्यांनी मोदींच्या दरबारात प्रश्न न्यावा, कोणीही क्रेडीट घ्यावे. महाराष्ट्राचे प्रश्न घेऊन राज्यपालांना भेटणं म्हणजे महाराष्ट्राचा अपमान आहे. सरकार लोकनियुक्त आहे, तिथे काय जायची गरज आहे. राज्यपालांनी राजभवनात राहावं, त्यांचा सर्व खर्च सरकारी तिजोरीतून होतो.

राजभवन हा राजकारण करण्याची जागा आहे. घटनात्मक जागा आहे, प्रतिष्ठा आहे ती त्यांनी जपावी. त्यांनी मैदानात यावं मग आम्ही राजकारण खेळू, असा टोमणा त्यांनी यावेळी मारला.

शिवसेनेचं हिंदूत्व आणि भाजपचं हिंदूत्व एक वर्षापुर्वी सेम होतं, आता वेगळं आहे. हिंदूत्व म्हणजे राष्ट्रीयत्व, शेंडी-जानवं, घंटा बडवणाऱ्यांचं नसावं, सर्वसमावेशक असावं ही बाळासाहेबांची भुमिका होती. सत्तेत येण्यासाठी हिंदुत्वाचा आधार केव्हाच घेतला नाही.

रा.स्व.संघ, विश्व हिंदू परिषदेवर विनाकारण टिप्पणी केली नाही. आंतरराष्ट्रीय राजकारण, मुस्लिम यांच्या संदर्भात जगात आंदोलनं झाली पण मुंबई शांत होती. राज्याचे मुख्यमंत्री, गृहमंत्री सक्षम आहेत, असे स्पष्टीकरण त्यांनी दिले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.