Pune News : ससूनचे किमान 60 टक्के बेड्स कोविडसाठी उपलब्ध करा – मुरलीधर मोहोळ

एमपीसी न्यूज : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी पुण्यातील ससून रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. मुरलीधर तांबे यांची भेट घेऊन महत्त्वाच्या विषयांवर चर्चा केली.

पुणे शहरात दररोज सरासरी 25 हजारांपेक्षा जास्त कोरोना चाचण्या होत असल्या, तरी त्यातील सरकारी पातळीवरील RT-PCR चाचण्यांची संख्या केवळ 2 हजारांच्या आसपास आहे. ही संख्या तातडीने वाढवावी, यासाठी गेली अनेक दिवस आपण सातत्याने पाठपुरावा करत आहोत. यासंदर्भात डॉ. तांबे यांच्याकडे तातडीने ही क्षमता वाढविण्यासाठी चर्चा केली. सरासरी 25 हजार पैकी 23 हजार चाचण्या या खाजगी लॅबमधून होत असल्याने संसर्गाची भीती जास्त आहे. कारण खाजगी लॅबमध्ये टेस्टिंग केल्यावर संबंधित रुग्ण संबंधित व्यक्ती विलगीकणात राहीलच असे नाही, त्यामुळेच संसर्ग वाढण्याचा धोका आहे.

आणखी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे, ससून रुग्णालयात एकूण बेड्सची संख्या 1 हजार 750 इतकी आहे. मात्र असं असतानाही कोरोनासाठी केवळ 520 बेड्स ससूनने उपलब्ध केले आहेत. एकीकडे शहरातील सर्व रुग्णालयांचे 80% बेड्स कोविडसाठी राखीव ठेवले असताना ससूनमध्ये मात्र ही टक्केवारी अत्यंत कमी आहे. म्हणूनच ससूनमध्ये किमान 60 टक्के बेड्स तरी राखीव ठेवावेत, या संदर्भातही चर्चा केली. असे झाल्यास आणखी जवळपास 500 बेड्स उपलब्ध होतील.

ससून रुग्णालयात #PMCares च्या माध्यमातून एकूण 86 व्हेंटिलेटर प्राप्त झाले होते. त्यापैकी 54 व्हेंटिलेटर सुरू असून 32 व्हेंटिलेटर नादुरुस्त असल्याचे डॉ. तांबे यांच्याकडून सांगण्यात आले, याबाबत चर्चा झाली. आपल्या पुणे महानगरपालिकेला #PMCares मधून एकूण 34 व्हेंटिलेटर प्राप्त झाले होते. त्यापैकी 33 व्हेंटिलेटर सुरु असून त्याचा वापर उपचारांसाठी केला जात आहे. पुणे महापालिकेला मिळालेले व्हेंटिलेटर सुरु असताना ससूनमधील व्हेंटिलेटर बंद राहण्याचे कारण काय? हा प्रश्न उपस्थित राहिला आहे त्याचाही खुलासा लवकर होणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.