Pune News : पुणे महानगरपालिकेच्या रुग्णालयातील रुग्णांना रेमडेसिविर इंजेक्शन त्वरित उपलब्ध करा : दीपाली धुमाळ

एमपीसी न्यूज – पुणे महानगरपालिकेच्या रुग्णालयातील रुग्णांना रेमडेसिविर इंजेक्शन त्वरित उपलब्ध करा, अशी मागणी विरोधी पक्षनेत्या दीपाली धुमाळ यांनी मनपा आयुक्त विक्रम कुमार यांच्याकडे केली आहे.

पुणे शहरात दिवसेंदिवस कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढत आहे. गेल्या काही दिवसांपासून पुणे शहरात रोज 7 हजारांच्या वर रुग्णांची संख्या आहे. वाढत असलेल्या रुग्णांच्या संख्या च्या मानाने महानगरपालिकेतर्फे आवश्यक ती योजना झाल्याचे दिसत नाही. प्रशासन व सत्ताधारी या संबधी अनेक उपाययोजना व निर्णय व धोरण ठरवताना दिसत नाही. परंतु प्रशासन प्रयत्न करत आहेत परंतु फारसा यश मिळत नाही. उलट अधिकच परिस्थिती गंभीर होत चाललेली दिसत आहे. बाधित रुग्णांना रेमडेसिविर इंजेक्शन्स उपलब्ध होत नाही. ऑक्सिजन बेड्स उपलब्ध होत नाही.

व्हेंटीलेटर बेड्स उपलब्ध होत नाहीत. अनेक रुग्ण बेड्स न मिळाल्यामुळे घरीच राहात आहेत. तसेच खाजगी रुग्णालयांमध्ये सुद्धा बेड्स उपलब्ध होत नाही,त्यामुळे नाहक त्रास पुणेकरांना सहन करावा लागत आहे.

पुणे महानगरपालिकेच्या विविध रुग्णालयात उदा जम्बो कोविड सेंटर सी.ओ ई.पी, दळवी हॉस्पिटल जम्बो कोविड सेंटर बाणेर व इतर मनपाचे उभारण्यात आलेले छोटे मोठे कोविड सेंटर येथे सुमारे 9 हजार रुग्ण उपचार घेत आहेत. परंतु गेल्या तीन दिवसांपासून सदर रुग्णांना एकही रेमडेसिविर इंजेक्शन उपलब्ध झाले नाही.

9 हजार रुग्णांमधील 1200 ते 1500 रुग्णांना रेमडेसिविर इंजेक्शनची अत्यंत आवश्यकता असून त्यांना वेळेवर उपलब्ध होत नाही. पुणे शहरात महापालिकेतील हाॅस्पिटल मध्ये गेले 3 दिवसात एकही रेमडेसिविर इंजेक्शन उपलब्ध न झाल्याने रुग्णांचे H.R.T.C लेव्हल 12 च्या पुढे गेले आहे. त्यामुळे रुग्णांमध्ये व त्यांच्या नातेवाईकांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे.

तसेच सत्ताधारी व प्रशासन रेमडेसिविर इंजेक्शन मिळवण्यासंबंधी कुठलीच हालचाल करताना दिसत नाही. सत्ताधारी भाजप नागरिकांवर अन्याय करत आहेत. नागरिकांच्या व रुग्णाच्या जिवाशी ही मंडळी खेळ करत आहे.हे राजकारण कुठे तरी थांबले पाहिजे. या आधी पुणे महानगरपालिकेने अनेक वस्तू पाहिजे त्या रक्कमानी 67/3(क) खाली कुठल्याही परवानगी शिवाय खरेदी केले आहेत, तसेच रेमडेसिविर इंजेक्शन सुद्धा मिळेल तिथे, मिळेल त्या कंपनीकडून 67/3(क) खाली खरेदी करून तातडीने रुग्णांपर्यंत पोहचवण्यात यावा.

यासंदर्भात महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांच्याशी संपर्क साधला असता सदर इंजेक्शन कुठेच उपलब्ध नाहीत कंपनीकडून डायरेक्ट खरेदी करण्यास प्रशासन तयार आहे. एक ते दोन दिवसात इंजेक्शन उपलब्ध होतील अशी खात्री आयुक्तांनी दिली. जर इंजेक्शन उपलब्ध झाले नाही तर या इंजेक्शन अभावी रुग्णांचा मृत्यू झाल्यास सर्वस्वी जबाबदार सत्ताधारी भाजप असेल.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.