Pune News : ‘पीएमपी’ बस सेवा सक्षम केल्यास पुणे प्रदूषणमुक्त होईल : देवेंद्र फडणवीस

एमपीसी न्यूज – पुणेकरांना सार्वजनिक वाहतूकची सवय लागली पाहिजे, ते काम आपण करतोय. लवकरच मेट्रोचे उद्घाटन होईल. देशात नागपूर आणि पुणे मेट्रोचे काम जोरात सुरू आहे. पुण्यात ‘पीएमपी’ बससेवा अधिक सक्षमपणे करून तसेच दहा रुपयांत बस प्रवास योजना सुरु झाल्याने पुणे प्रदूषणमुक्त होईल, असा विश्वास विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.

अटल सेवा, शटल सेवा पुण्यदशम फक्त दहा रुपयांत दिवसभर ‘एसी’ बसचा प्रवास या योजनेचे उद्घाटन पीएमपीसाठी 50  मिडी बसेसचे लोकार्पण देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते आज, शुक्रवारी मंडई येथे करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी महापौर मुरलीधर मोहोळ, खासदार गिरीश बापट, स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने, सभागृह नेते गणेश बिडकर, आमदार माधुरी मिसाळ, सिद्धार्थ शिरोळे, सुनील कांबळे यावेळी उपस्थित होते.

देवेंद्र फडणवीस म्हणाले, मोनोरेल, मेट्रो, रेल्वेसाठी सिंगल तिकीटावर प्रवास होतोय. एचसीएमटीआरमध्ये काही बदल केले पाहिजेत. पुण्यातील जागरूक संस्थाचे काही म्हणणे आहे. न्यू मेट्रोचे काम दीक्षित करतील. त्यासाठी महापालिकेने पुढाकार घ्यावा. ‘जायका’चे काम लवकरच सुरू करावे, असे सांगून स्थायी समिती अध्यक्ष बजेट सांभाळण्याचे काम उत्तमरित्या करीत असल्याचे गौरवोद्गारही फडणवीस यांनी काढले.

चंद्रकांत पाटील म्हणाले, पुणे महापालिका सर्वच कामे चांगली करीत आहेत. त्याबद्दल मनपा नेतृत्वाचे अभिनंदन.

गिरीश बापट म्हणाले, पुणे महापालिकेने चांगले काम केले. पुणे शहर सिलिंडर मुक्त करतोय. 35 ते 40 कोटी लस देत आहोत. याकामी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मोठा वाटा उचलला आहे. मेट्रो आणण्यात मोठा पुढाकार केंद्र शासनाने घेतला आहे. आगामी पुणे महापालिका निवडणुकीत आमचे 100 आणि आणि आरपीआयचे 10 नगरसेवक निवडून येतील, असा विश्वासही बापट यांनी व्यक्त केला.

हेमंत रासने म्हणाले, अजून काही महत्त्वाची कामे करायची आहेत. महापालिकेत 23 गावे समाविष्ट केली. कोरोनाचा सक्षमपणे सामना केला. एक रुपया सुद्धा करवाढ न करता महसूल जमा केला. महसूल समिती स्थापन केली. 7 हजार 500 कोटी महसूल जमवू, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.

जगदीश मुळीक म्हणाले, आजपासून दहा रुपयांत बससेवेचा प्रारंभ होतेय. दोन हजार बसेस रस्त्यावर आणतोय. राष्ट्रवादीने केवळ 200 बसेस रस्त्यावर आणल्या. 24 बाय 7 समान पाणीपुरवठा योजनेचा प्रकल्प लवकरच सुरू होईल. मेट्रोची ट्रायल सुरू आहे. 23 गावांचा समावेश आवश्यक होता. राष्ट्रवादी गावांमध्ये विकासकामे करण्यात अपयशी ठरली. गावांच्या विकासासाठी 10 हजार कोटी राज्य शासनाने द्यावेत, अशी मागणी त्यांनी यावेळी केली.

उपमहापौर सुनीता वाडेकर यांनी आभार मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.