Pune News : महालक्ष्मी मंदिरातील आंबा प्रसादाचे पालिकेच्या नायडू व दळवी हॉस्पिटलमधील रुग्णांना वाटप

एमपीसी न्यूज – सारसबागेसमोरील श्री महालक्ष्मी मंदिरात नुकतेच आंबे आणि मोगऱ्याच्या फुलांची आकर्षक आरास करण्यात आली होती. आरास करताना श्री महालक्ष्मी, महासरस्वती आणि महाकाली देवीसमोर मांडण्यात आलेला 800 आंब्यांचा प्रसाद पालिकेच्या नायडू व दळवी हॉस्पिटलमधील रुग्णांना देण्यात आला आहे.

श्री बन्सीलाल रामनाथ अग्रवाल धार्मिक व सांस्कृतिक ट्रस्ट, श्री महालक्ष्मी मंदिर सारसबागतर्फे देवीसमोर आंब्याची आरास करुन प्रसाद रुग्णांना देण्याचा उपक्रम राबविण्यात आला. यावेळी ट्रस्टचे प्रमुख संस्थापक विश्वस्त राजकुमार अग्रवाल, प्रमुख विश्वस्त अमिता अग्रवाल, विश्वस्त अ‍ॅड.प्रताप परदेशी, भरत अग्रवाल, तृप्ती अग्रवाल, विश्वस्त व नगरसेवक प्रविण चोरबेले यांसह इतर विश्वस्त उपस्थित होते.

राजकुमार अग्रवाल म्हणाले, सामाजिक कार्यक्रमांमध्ये मंदिरातील श्री महालक्ष्मी, श्री महासरस्वती, श्री महाकाली व श्री विष्णु यांच्या उत्सव मूतीर्ची धान्यतुला करुन ते धान्य अनाथ मुलांच्या संस्थेस वाटप करण्याचा उपक्रम यावर्षी ब्रह्मोत्सवात राबविण्यात आला होता. आता मे महिन्यात आंब्याचा प्रसाद रुग्णांना देण्याचा उपक्रमही ट्रस्टने राबविला आहे. धार्मिकतेच्या माध्यमातून सामाजिक उपक्रम राबविण्याचा ट्रस्टचा नेहमीच प्रयत्न असतो.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.