Pune News : मराठा क्रांती मोर्चाने केली अध्यादेशाची होळी !

एमपीसी न्यूज : ‘मराठा आरक्षण आमच्या हक्काचे नाही कुणाच्या बापाचे…. या सरकारचे करायचे काय खाली डोकं वर पाय… एक मराठा लाख मराठा… ‘अशा घोषणा देत सकल मराठा समाज आणि मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने महाविकास आघाडी सरकारचा जाहीर निषेध करण्यात आला.

राज्य सरकारने ईडब्ल्युएस आरक्षण देण्याचा निर्णय घेतला. त्या निर्णयाविरोधात सरकारच्या अध्यादेशाची होळी करण्यात आली. या आंदोलनाला मोर्चाचे राज्य समन्वयक राजेंद्र कोंढरे, रघुनाथ चित्रे पाटील, मीना कुंजीर, श्रृतिका पाडाळे यांसह मराठा समाजातील कार्यकर्ते उपस्थित होते.

यावेळी बोलताना कोंढरे म्हणाले, आंध्र प्रदेश आणि तामिळनाडूमधील आरक्षणांसह सर्व याचिकामध्ये 50 टक्के मर्यादेचे उल्लंघन करुन देण्यात आलेले आरक्षण आव्हानित आहे. अशा परिस्थितीमध्ये मराठा समाजाला आर्थिक दुर्बल घटक प्रवर्गातुन (इडब्ल्युएस) आरक्षण दिल्यास मराठा आरक्षणाच्या घटनापीठासमोरील अंतिम सुनावणी मध्ये युक्तीवाद करताना कायदेशीर अडचणी निर्माण होणार आहेत. राजकीय सोयीनुसार हा निर्णय घेतला असून सर्वोच्च न्यायालयातील प्रलंबित एससीबीसी केसचा पाया खिळखिळीत करण्यासाठीच असा निर्णय घेण्यात आला आहे. मराठा समाजाच्या आरक्षणाचा हा खून आहे, असा आरोपही त्यांनी केला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.