Pune News : मराठा क्रांती मोर्चातर्फे विविध राजकीय पक्षांच्या कार्यालयासमोर आक्रोश आंदोलन

एमपीसी न्यूज – आरक्षण आमच्या हक्काचे, मराठा आरक्षण, सारथी संस्था व मराठा समाजाच्या आदी मागण्यांसाठी मराठा क्रांती मोर्चातर्फे रविवारी विविध पक्षाच्या कार्यालयासमोर आक्रोश आंदोलन करण्यात आले.

सर्वोच्च न्यायालयातील स्थगिती उठवावी, सारथीची मुस्कटदाबी बंद करावी, आण्णासाहेब पाटील महामंडळाचा व्याज परतावा योजनेसाठी निधीची तरतूद करावी आदी मागण्या यावेळी करण्यात आल्या.

आज सकाळी 10.30 वाजता राष्ट्रवादी काँग्रेसच्या टिळक रस्त्यावरील कार्यालयासमोर कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजीने परिसर दणाणून सोडला. यानंतर पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष व आमदार चेतन तुपे, प्रवक्ते अंकूश काकडे यांनी मराठा क्रांती मोर्चाच्या मागण्यांचा पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर सर्वांनी डेक्कन जिमखाना येथील शिवसेना पक्षाच्या कार्यालयासमोर आंदोलन केले.

रमेश कोंडे, रामभाऊ पारीख, श्याम देशपांडे, राजा शिळीमकर, संगिता ठोसर आदींनी मागण्यांचा पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले. पुणे शहर भारतीय जनता पक्षाच्या कार्यालयासमोर कार्यकर्त्यांनी एक मराठा लाख मराठा या घोषणांनी परिसर दणाणून सोडला.

येथे खासदार गिरीश बापट, आमदार भीमराव तापकीर, नगरसेवक राजेश एनपुरे, बप्पू मानकर आदींनी आंदोलनकर्त्यांची भेट घेऊन मराठा समाजाच्या मागण्यांचा पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले. महिला आंदोलनकर्त्या मीना जाधव, दिपाली पाडळे, विनया पाटील, अश्विनी शिंदे, वैशाली कोंढरे सहभागी झाल्या होत्या.

काँग्रेस भवन येथे आंदोलनाची संगता झाली. आमदार संजय जगताप, रमेश बागवे, कैलास कदम आदींनी यावेळी मनोगत व्यक्त केले. तसेच पाठपुरावा करण्याचे आश्वासन देणारे लेखी निवेदन काँग्रेस पक्षातर्फे मराठा क्रांती मोर्चाच्या नेत्यांना दिले.

या आंदोलनाचे नेतृत्व राजेन्द्र कोंढरे, राजेंद्र कुंजीर, नामदेव मानकर, रघुनाथ चित्रे पाटील, बाळासाहेब आमराळे, युवराज दिसले, सचिन आदेकर, तुषार काकडे, धंनजय जाधव विकास पासलकर आदिंनी केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.