Pune News ; विवाहित पोलीस उपनिरीक्षकाला ‘लिव्ह इन’प्रकरण पडले महागात

पोलीस आयुक्तांकडून निलंबनाची कारवाई

एमपीसीन्यूज : पहिले लग्न झालेले असताना दुसऱ्या तरुणीसोबत प्रेम प्रकरण करणे एका पोलिस निरीक्षकाला चांगलेच अंगलट आले आहे. तरुणीला लग्नाच्या आमिष दाखवून ‘लिव्ह इन’मध्ये राहून नंतर लग्नास नकार दिला. या प्रकरणी त्या पोलिस उपनिरीक्षकाला निलंबित करण्याचे आदेश अतिरिक्त पोलिस आयुक्त एन. डी. चव्हाण यांनी दिले आहेत.

हिमालय रामचंद्र जोशी असे निलंबित केलेल्या पोलिस अधिकाऱ्याचे नाव आहे. जोशी हे हडपसर पोलिस ठाण्यात नेमणुकीला आहेत. त्यांचे पूर्वी लग्न झालेले आहे. नवी पेठेतील एका मुलीशी ओळख झाल्यानंतर या दोघांमध्ये प्रेमसंबंध निर्माण झाले. डिसेंबर २०१९ पासून संबंधित तरुणी व जोशी हे लिव्ह इनमध्ये राहत होते. मात्र, त्यानंतर त्यांच्यात वाद झाले. त्यानंतर जोशी यांनी त्या तरुणीसोबत लग्न करण्यास नकार दिला.

_MPC_DIR_MPU_II

त्यानंतर संबंधीत तरुणीने भरोसा सेलमधील महिला सहायता कक्षाकडे धाव घेऊन तक्रार दिली. या ठिकाणी दोघांचे समुपदेशन करण्यात आले. त्यावेळी तरुणीने महिला दक्षता समितीच्या सदस्यांसमोर नंतर कोणतीही तक्रार नसल्याचे लिहून दिले आहे.

मात्र, जोशी हे पोलिस दलात अधिकारी असून विवाहित आहेत. तरीही एखाद्या मुलीसोबत प्रेमसंबंध ठेऊन तिच्यासोबत ‘लिव्ह इन’मध्ये राहणे, तिला गर्भपात करायला भाग पाडणे हे पदास अशोभणीय आहे. तसेच, पोलिस दलाच्या प्रतिमेला बाधा आणणारे आहे. त्यांनी केलेले वर्तन पोलिस दलाच्या शिस्तीस धरून नाही.

यामुळे पोलिस खात्याची प्रतिमा मलीन झाली आहे. या वर्तनाबद्दल जोशी यांना पोलिस खात्यामधून निलंबित करण्यात आले आहे. या निलंबन कालावधीमध्ये पोलिस मुख्यालय निरीक्षकांकडे दररोज हजेरी द्यावी, असे आदेशात म्हटले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.