Pune News : माशेलकर सर हे रसायनच वेगळं : देवेंद्र फडणवीस

एमपीसी न्यूज : माशेलकर सर हे नुसतेच रसायनशास्त्रज्ञ नाहीत तर ते रसायनच वेगळं आहे. गांधीजींचा विचार हा किती वस्तुनिष्ठ आहे ते सरांनी मांडण्याचे काम केले आहे. तर अटलजींनी माशेलकर समिती नेमली. त्यामध्ये अनेक जबाबदाऱ्या टाकल्या. त्या सामर्थ्यपणे पार पाडल्या आहेत. आज आपण एका कर्मयोग्याच्या नावाचा पुरस्कार दुसऱ्या कर्मयोग्याला देत असल्याचे प्राजंळ मत देवेंद्र फडणविस यांनी व्यक्त केले.

पुण्यातील बालगंधर्व रंगमंदीर येथे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या जयंती निमित्ताने संस्कृती प्रतिष्ठानच्या वतीने ‘अटल संस्कृती गौरव पुरस्कार’ शास्त्रज्ञ आणि पद्मविभूषण डॉ. रघुनाथ माशेलकर यांना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते.

फडणवीस पुढे म्हणाले, डॉ.रघुनाथ माशेलकर यांचा सत्कार माझ्या हस्ते केल्याने माझा बायोडाटा समृद्ध झाला आहे. तसेच आज अटलजी यांच्या नावाने माशेलकर सरांना गौरविले जात आहे. ती समाधानाची बाब असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.

अटलजी हे देशाला पडलेले एक स्वप्न आहे. अटलजी हे संवेदनशील कवी मनाचे होते. त्यांनी देशासह, जगाला त्यांच्या कामातून संदेश देण्याचे काम केले असून, हे सर्वांच्या कायम स्मरणात राहणारे आहे. माशेलकर सरांनी हळद आणि बासमतीच्या पेटंटची लढाई जिंकून दिली. ही आपल्या सर्वासाठी अभिमानाची आणि गौरवाची बाब असल्याची भावना फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.