Pune News : जास्तीत जास्त पदवीधरांनी मतदार यादीत नावे नोंदवा : चंद्रकांत पाटील

एमपीसी न्यूज – पदवीधरांचे प्रश्न सोडवण्यासाठी आपला प्रतिनिधी विधानसभेत पाठवणे गरजेचे आहे. यासाठी जास्तीत जास्त पदवीधरांनी आपली नावे मतदार यादीत नोंदवावीत, असे आवाहन भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केले.

भाजप शहर चिटणीस सुनील माने यांच्या वतीने ‘पदवीधर मतदार नोंदणी आपल्या दारी’ हे अभियान राबवण्यात येणार आहे. या अभियानाचे उद्घाटन चंद्रकांत पाटील तसेच खासदार गिरीश बापट यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते.

भाजप शहर कार्यालयामध्ये झालेल्या या कार्यक्रमाला पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ, शहराध्यक्ष जगदीश मुळीक, शिवाजीनगर मतदारसंघाचे आमदार सिद्धार्थ शिरोळे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम झाला.

यावेळी पश्चिम महाराष्ट्राचे संघटनमंत्री रवी अनासपुरे, स्थायी समिती अध्यक्ष हेमंतजी रासने, शहर संघटन सरचिटणीस राजेश पांडे, सरचिटणीस गणेश घोष, दत्ताभाऊ खाडे, दीपक नागपुरे, राजेश येनपुरे, दीपक पोटे, भाजयुमोचे शहराध्यक्ष राघवेंद्र (बापू) मानकर, महिला शहराध्यक्षा अर्चना पाटील, शहर सुधारणा समितीचे अध्यक्ष प्रसन्न जगताप, नगरसेवक अमोल बालवडकर, उमेश गायकवाड, उपाध्यक्ष गणेश कळमकर, योगेश बाचल, शिवाजीनगर मतदारसंघाचे अध्यक्ष रवींद्र साळेगावकर, कोथरुड मतदारसंघाचे अध्यक्ष पुनीत जोशी, भाजयुमोचे सरचिटणीस प्रतिक देसरडा आदी उपस्थित होते.

चंद्रकांत पाटील म्हणाले, कोरोना मुळे पदवीधर मतदारांना प्रत्यक्ष मतदार यादीत नाव नोंदणी करणे शक्य होत नाही. त्यामुळे निवडणूक आयोगाने डिजिटल पर्याय उपलब्ध करून दिला आहे. तरीही पदवीधर मतदार नोंदणीस म्हणावा तसा प्रतिसाद मिळत नाही. अशा परिस्थिती मध्ये सुनील माने यांनी सर्वसामान्यांच्या सोयीसाठी मोबाईल व्हॅन तयार केली आहे. घरोघरी जाऊन मतदार नोंदणी अभियान राबवल्याने मतदार नोंदणीसाठी चांगला प्रतिसाद मिळेल.

खासदार बापट म्हणाले, पदवीधर मतदार नोंदणी मोहीम यशस्वी करण्याच्या दृष्टीने जास्तीत जास्त मतदार नोंदणी कशी होईल, याचा विचार करून सुनील माने यांनी हे अभियान सुरु केले आहे. यामुळे जनजागृती होऊन अधिक मतदारांची नोंद होईल.

शहर अध्यक्ष जगदीश मुळीक यांनीही आपल्या मनोगतातून या उपक्रमाला शुभेच्छा दिल्या. पुणे पदवीधर मतदार संघाची जागा तिसऱ्यांदा मिळवण्यासाठी हा उपक्रम नक्कीच उपयुक्त ठरेल, असा विश्वास व्यक्त केला.

सुनील माने म्हणाले, पदवीधर मतदार संघामध्ये जास्तीत जास्त मतदार वाढवण्यासाठी एक व्यापक दृष्टिकोन ठेऊन हा उपक्रम सुरू केला आहे. ही मोबाईल व्हॅन डेक्कन, शिवाजीनगर,औंध, बोपोडी या भागातील सोसायट्यांमध्ये जाऊन प्रत्यक्ष कागदपत्रे स्कॅन करून मतदारांची नोंद करून घेईल. त्याचबरोबर मतदारांच्या नाव नोंदणीसाठी 9158483813 या व्हॉट्सऍप क्रमांकही उपलब्ध करून दिला आहे. यामुळे सर्वसामान्य मतदारांना नाव नोंदणी करणे सोपे जाईल.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.