Pune News : ससूनमधील कोविड बेडची संख्या वाढण्यासाठी महापौरांचे वैद्यकीय शिक्षणमंत्री आणि आरोग्यमंत्र्यांना पत्र

एमपीसी न्यूज – पुणे शहरात कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत चालला आहे. पुणे महानगरपालिका सर्वांच्या सहकार्याने विविध पातळीवर यासंदर्भात उपाययोजना राबवित आहे. मात्र संसर्गाची व्याप्ती पाहता ससून रुग्णालयातील कोविड बेड्सची संख्या लवकरात लवकर वाढावा, अशी मागणी महापौर मुरलीधर मोहोळ यांनी वैद्यकीय शिक्षण मंत्री आणि आरोग्य मंत्र्यांकडे पत्राद्वारे केली आहे.

ससूनमध्ये कोविड बेड वाढवा आणि आरटी-पीसीआर चाचण्यांची क्षमता वाढवा, अशी मागणी महापौर मोहोळ यांनी वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख आणि आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्याकडे केली आहे.

याबाबत माहिती देताना महापौर मोहोळ म्हणाले, ‘आम्ही जास्तीत जास्त चाचण्या करणे, शहरामध्ये ऑक्सिजन बेडस, आयसीयू बेडस उपलब्ध करणे, लसीकरण वेगाने करणे अशा स्वरूपाचे काम युद्धपातळीवर करत आहोत. मात्र शहरातील वाढती रुग्ण संख्या पाहता त्या प्रमाणात बेडसची उपलब्धता हे सर्वात मोठे आव्हान आमच्यासमोर आहे. महापालिकेच्या स्तरावर आमची सर्व हॉस्पिटल्स आज पूर्ण क्षमतेने सुरू आहेत. शिवाय खाजगी हॉस्पिटलचे सुद्धा 80% बेडस ताब्यात घेण्यात आले आहेत. तथापि ससून रुग्णालयातील बेडसची क्षमता 1750 असूनही त्या ठिकाणी कोरोना रुग्णांसाठी केवळ 500 बेडस उपलब्ध करून देण्यात आले आहेत’

‘ससूनमधील 60% बेडस कोरोना रुग्णांसाठी राखीव केले, तरी याठिकाणी बेडसची संख्या 1050 इतकी होऊ शकते. त्यामुळे शहराची कोरोनाची एकूण स्थिती पाहता आपण त्वरित अशाप्रकारे आदेश द्यावेत ही विनंती पत्राद्वारे केली आहे. तसेच कोरोनाचा संसर्ग लवकर नियंत्रणात येण्यासाठी RTPCR चाचण्यांची संख्या वाढविणे अत्यावश्यक आहे. आम्ही त्या दृष्टीने मोठ्या प्रमाणावर RT-PCR चाचण्या शहरांमध्ये करत आहोत.

दररोज 25 हजार ते 30 हजार चाचण्या आम्ही करत आहोत. परंतु यातील फक्त 3 हजार चाचण्यांची तपासणी ससून मधील सरकारी लॅबमध्ये केली जातात. उर्वरित चाचण्यांची तपासणी खासगी लॅब मार्फत केली जात आहे. म्हणजेच जवळपास 20 हजारापेक्षा जास्त नागरिक जे खाजगी लॅबमध्ये चाचण्या करतात, त्यांचे रिपोर्ट तीन ते चार दिवस विलंबाने येत असल्याने त्यांच्यामार्फत शहरात संसर्ग वाढण्याचा धोका मोठ्या प्रमाणावर होत आहे. म्हणूनच ससूनमध्ये सुरू असलेल्या चाचण्यांची तपासणी क्षमता वाढवण्याची अत्यंत निकड आहे. किमान 10 हजार चाचण्यांची तपासणी या ठिकाणी होणे आवश्यक आहे, असेही महापौर मोहोळ म्हणाले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.