Pune News: मेहेंदळे गॅरेज चौक ते म्हात्रे पूल दरम्यान पाणी तुंबल्याने वाहनधारकांना मनस्ताप- मंजुश्री खर्डेकर

यावर्षीच्या अर्थसंकल्पात तरतूद करुन येथे पावसाळी लाइन टाकण्याचे ठरले. पौड फाटा ते नळस्टॉप येथे ही कामाचे नियोजन केले. मात्र, कोरोनाच्या संकटकाळी विकास कामे करायची नाहीत हे पटत नाही, असेही त्या म्हणाल्या.

एमपीसी न्यूज – मेहेंदळे गॅरेज चौक ते म्हात्रे पूल दरम्यान प्रचंड पाणी साचते. त्यामुळे वाहनधारकांना मनस्ताप होत असल्याचे नगरसेविका मंजुश्री खर्डेकर यांनी सांगितले. गतवर्षी आपण भर पावसात अधिकाऱ्यांसह पाहणी केली. यावर्षीच्या अर्थसंकल्पात तरतूद करुन येथे पावसाळी लाइन टाकण्याचे ठरले. पौड फाटा ते नळस्टॉप येथे ही कामाचे नियोजन केले. मात्र, कोरोनाच्या संकटकाळी विकास कामे करायची नाहीत हे पटत नाही, असेही त्या म्हणाल्या.

2020 – 2021 च्या अर्थसंकल्पानुसार विकासकामे सुरु करण्याची विनंती मंजुश्री खर्डेकर यांनी महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांच्याकडे केली आहे. पुणे मनपाचा अर्थसंकल्प सादर झाल्यावर कोरोनाच्या संकटाने घेरले.

त्यानंतर गतवर्षीची काही कामे मुदतवाढ दिल्यामुळे झाली तर अनेक कामे रखडली आहेत. दरम्यान कोरोना संकट गहिरे झाले व लॉकडॉउनमधे सर्व क्षेत्र प्रभावित झाले. मे महिन्यात राज्य सरकारने परिपत्रक काढून सर्व कामे स्थगित करण्याचे आदेश दिल्याचे समजते.

याबाबत त्वरित राज्य शासनाकडे पाठपुरावा करुन अनुकूल निर्णय करुन घ्यावा. अर्धे वर्ष संपले न्यू नॉर्मल आणि अनलॉकच्या प्रक्रियेत खासगी व्यवसायिकांची बांधकामे सुरु झाली, कारखाने सुरु झाले, अशा वेळी मनपाची विकास कामे का थांबवण्यात आली, असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे.

प्रशासनाने आवश्यक कामांची यादी करावी, प्रलंबित कामांची यादी करावी, सुशोभिकरण किंवा अन्य कामांमधे काटछाट करावी, पण आवश्यक कामांच्या निविदा लगेच जारी कराव्यात, अन्यथा न्यू नॉर्मलमध्ये अर्धवट कामांमुळे सामान्य नागरिकांना वेगळ्याच प्रश्नांना तोंड द्यावे लागेल. या पत्राची दखल घेऊन त्वरित कार्यवाही करावी, असेही त्यांनी म्हटले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.