Pune News : मेट्रोची चाचणी यशस्वी; काँग्रेसची स्वप्नपूर्ती – मोहन जोशी

एमपीसी न्यूज – पुणे मेट्रो रेलची ‘ट्रायल रन’ आज (शुक्रवारी) सकाळी यशस्वी झाली आणि काँग्रेसची स्वप्नपूर्ती झाली, अशी प्रतिक्रिया माजी आमदार आणि महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष मोहन जोशी यांनी व्यक्त केली आहे.

शहरातील वाहतुकीच्या कोंडीवर तोडगा काढण्यासाठी मेट्रो, उड्डाणपूल, भुयारी मार्ग असे पर्याय तज्ज्ञांनी सुचविले होते आणि काँग्रेस पक्षाने आणि त्याच्या नेत्यांनी त्याचा सातत्याने पाठपुरावा केला होता. पुण्यात मेट्रो व्हावी, असा ठराव काँग्रेस पक्षाने महापालिकेत मंजूर केला होता. त्यानंतर दिल्ली मेट्रोकडे प्रारुप आराखडा बनविण्याचे काम देण्यात आले होते. हा आराखडा काही किरकोळ बदलांसह काँग्रेसच्याच शासनकर्त्यांनी मंजूर केला. मेट्रोसाठी जागा संपादन, राज्य, केंद्र सरकारची मंजुरी, वित्तीय संस्थांची मदत अशा सर्व किचकट प्रक्रिया काँग्रेसच्याच शासनाने मंजूर करुन घेतल्या होत्या. माजी मुख्य मंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी या प्रक्रियांना वेग दिला.

मेट्रो रेल्वेसाठी कायदा तयार करुन मेट्रोच्या विस्ताराची मुभाही काँग्रेस शासनानेच दिली. काँग्रेस नेतृत्वाने अतिशय चिकाटीने या गोष्टीचा पाठपुरावा केल्याने आज मेट्रोची स्वप्नपूर्ती झाली. मेट्रोची चाचणी यशस्वी झाली ही पुणेकरांसाठी आणि काँग्रेससाठी आनंदाची बाब आहे, असे माजी आमदार मोहन जोशी यांनी पत्रकात म्हटले आहे.

भाजपच्या शासनाने 2014 नंतर दोन, अडीच वर्षे या प्रकल्पाकडे दुर्लक्ष केले, अन्यथा हा प्रकल्प यापूर्वीच पूर्ण झाला असता, असेही जोशी यांनी पत्रकात म्हटले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.