Pune News : ‘एमआयटी’ने टेकडीलगत केलेला रस्ता पालिका उखडणार !; न्यायालयाने स्थगिती उठविली

एमपीसी न्यूज : कोथरुडमधील एमआयटी कॉलेजकडून टेकडीलगत बांधण्यात आलेला रस्ता पालिका प्रशासनाकडून काढण्यात येणार आहे. पालिका न्यायालयाने महाविद्यालयाला दणका दिला असून कारवाईवरील स्थगिती उठविली आहे. याबाबतचा आदेश सोमवारी देण्यात आल्याची माहिती मुख्य विधी अधिकारी अ‍ॅड. मंजुषा इधाटे यांनी दिली.

एमआयटीला पालिका प्रशासनाने बेकायदा रस्ता बांधल्याप्रकरणी एमआरटीपी अ‍ॅक्टच्या कलम 53 नुसार नोटीस बजावली होती. एमआयटीनेही याच कायद्याच्या कलम 44 अंतर्गत रस्त्याला परवानगी मागितली होती. पालिकेने हा प्रस्ताव फेटाळला होता.

न्यायालयात याबाबत दावा दाखल करण्यात आला. पालिका दाव्यात हजर झाली. दोन्ही पक्षांचे म्हणणे सादर करेपर्यंत दाव्याला स्थगिती देण्यात आली. पालिकेने या कारवाईविषयी लेखी म्हणणे दाखल केले.

यावर व्हिडीओ कॉन्फरन्सिंगवर युक्तीवाद झाल्यानंतर न्यायालयाने लेखी युक्तीवाद सादर करण्याच्या सूचना केल्या. पालिकेने युक्तीवाद दाखल केल्यानंतर 1 जानेवारी रोजी पुन्हा सुनावणी झाली. त्यावेळी एमआयटीने आपला युक्तीवाद दाखल केला.

न्यायालयाने दोन्ही युक्तीवाद ऐकल्यावर एमआयटीचा कारवाईला स्थगिती देण्याचा अर्ज फेटाळला. त्यामुळे पालिका आता कलम 53 नुसार कारवाई करु शकते असेही इधाटे यांनी सांगितले. या प्रकरणाचे कामकाज पालिकेचे वकील अ‍ॅड. संजय मुरकुटे यांनी पाहिले.

पालिकेकडे कलम 44 अंतर्गत दाखल करण्यात आलेला प्रस्ताव फेटाळण्यात आला असून त्यानंतर एमआयटीने राज्य शासनाकडे अपिल दाखल केले आहे. हे अपिल शासनाकडे प्रलंबित असल्याचे अ‍ॅड. इधाटे यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.