Pune News: मनसे आक्रमक! बंदी असतानाही ही कसबा गणपतीचे मंदिर उघडून केला अभिषेक

एमपीसी न्यूज – पुण्यातील मनसे पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आज मात्र आक्रमक भूमिका घेत पुण्याचे ग्रामदैवत असलेल्या कसबा गणपतीचे मंदिर उघडून कसबा गणपतीला अभिषेक घालत राज्यभरातील मंदिर उघडण्याची मागणी राज्य सरकारकडे केली. मनसेचे पुणे शहर अध्यक्ष अजय शिंदे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले.

कोरोनामुळे उद्भवलेल्या परिस्थितीनंतर बंद असलेली राज्यभरातील मंदिर आता अनलॉकच्या प्रक्रियेत उघडण्यात यावी, अशी मागणी वेगवेगळ्या पक्षांकडून करण्यात येत आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेना मंदिर उघडण्यासाठी सातत्याने वेगवेगळ्या प्रकारे आंदोलन करताना दिसत आहे. 

यावेळी बोलताना अजय शिंदे म्हणाले, राज्यात अनलॉकचा पाचवा टप्पा सुरू आहे. या टप्प्यात राज्यभरातील हॉटेल उघडण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे. वाहतूकही सुरू झाली आहे. उद्योग व्यवसायही सुरू झाली आहेत. मग फक्त मंदिर उघडण्यासाठी सरकारचा विरोध का? कोरोनाचे नाव पुढे करून मंदिर उघडण्यासाठी सरकार घाबरत आहे. कोरोना काय फक्त देवळातच आहे का, असा सवाल असे शिंदे यांनी यावेळी उपस्थित केला.

राज्य शासनाने आता स्वतःहून मंदिर सुरू केली नाही तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना राज ठाकरे यांच्या आदेशानुसार राज्यभरातील मंदिर उघडी करतील, असा इशाराही अजय शिंदे यांनी सरकारला यावेळी दिला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.