Pune News: जम्बो कोविड रुग्णालयाच्या विरोधात आंदोलन करणाऱ्या मनसेच्या रुपाली पाटील यांना अटक

एमपीसी न्यूज – जम्बो हॉस्पिटलमधील रुग्णांची होणारी गैरसोय दूर करून त्यांना आपल्या चांगल्या प्रकारच्या सुविधा उपलब्ध कराव्यात या मागणीसाठी मनसे स्टाईल आंदोलन करीत गेटवर चढून रुग्णालयात प्रवेश करणाऱ्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पुणे महिला शहराध्यक्ष ॲड. रूपाली पाटील ठोंबरे यांना शिवाजीनगर पोलिसांनी अटक केली. 

ॲड. रूपाली पाटील ठोंबरे यांनी गेल्या गुरुवारी हे आंदोलन केले होते.  त्या प्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून काल (मंगळवारी) त्यांना अटक करण्यात आली.

 

पुण्यातील हे जम्बो हॉस्पिटल तब्बल 86 कोटी रुपये खर्च करून उभारण्यात आले. या रुग्णालयात कोरोनाबाधित रुग्णांवर व्यवस्थित उपचार होत नसल्याचा आरोप रुग्णांच्या नातेवाइकांकडून करण्यात आले आहेत. शिवाय पुण्यातील पत्रकार पांडुरंग रायकर यांचा मृत्यू ही रुग्णालयाच्या हलगर्जीपणामुळे झाल्याचा आरोप त्यांच्या कुटुंबाकडून करण्यात आला होता.

त्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने हे आंदोलन करण्यात आले होते. यावेळी रूपाली पाटील ठोंबरे, ऋषिकेश बालगुडे यांच्यासह अन्य मनसैनिक उपस्थित होते. आंदोलकांना बाऊंसर रुग्णालयात सोडत नसल्यामुळे रुपाली पाटील यांनी गेटवर चढून आत प्रवेश केला होता. त्यांच्या पाठोपाठ इतरही कार्यकर्त्यांनी आतमध्ये प्रवेश केला होता.

शिवाजीनगर पोलिसांनी काल दुपारच्या सुमारास त्यांच्यावर गुन्हा दाखल करत त्यांना अटक केली आणि शिवाजीनगर कोर्टासमोर हजर केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.