Pune News : मोदी-शहांना देशापुढे झुकावे लागणारच : अजित नवले

एमपीसी न्यूज : केंद्र सरकारने शेतकऱ्यांसाठी तयार केलेल्या कृषी कायद्याविरोधात दिल्ली येथे मागील 20 दिवसांपासून लाखोंच्या संख्येने शेतकरी ठिय्या मांडून बसले आहे. त्यावर केंद्र सरकारने येत्या तीन दिवसात निर्णय घ्यावा; अन्यथा महाराष्ट्रामधून आंदोलन सुरू होईल. मग या आंदोलनापुढे मोदी आणि शहा यांना देशापुढे झुकावे लागणारच, असा विश्वास अखिल भारतीय किसान सभेचे सरचिटणीस अजित नवले यांनी व्यक्त केला.

पुणे श्रमिक पत्रकार संघात पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

यावेळी नवले म्हणाले, केंद्र सरकारच्या कृषी विधेयक कायद्या विरोधात 20 दिवसांपासून दिल्लीत आंदोलन सुरू आहे. तेथील आंदोलनकर्त्यांचा आवाज दाबण्याचे काम केंद्र सरकार करीत आहे. हे आजवरच्या घटनेतून दिसून आले. या सरकारला हिंसा पाहिजे, शेतकर्‍यांचा संयम तुटला पाहिजे, अशी केंद्र सरकारची भूमिका आहे.

या आंदोलनात खलिस्तानी, फुटीरतावादी सहभागी असल्याचे म्हटले जाते, ही बाब अत्यंत दुर्देव असल्याचे सांगत त्यांनी खंत व्यक्त केली.

त्या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर अखिल भारतीय किसान सभेची काल बैठक झाली. यामध्ये राज्यातील सर्व पदाधिकारी सहभागी झाले. त्यामध्ये असा निर्णय घेण्यात आला की, येत्या तीन दिवसात केंद्र सरकारने आंदोलनकर्त्यांची दखल न घेतल्यास महाराष्ट्रामधून आंदोलन सुरू केले जाईल आणि हे आंदोलन सर्वांना हेवा वाटेल असे असणार आहे.

यापूर्वी देखील आम्ही नाशिक ते मुंबई पर्यंत पायी चालत आलो. त्या आंदोलनाची दखल तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना घ्यावीच लागली. त्यामुळे आमच्या आंदोलनापूर्वी केंद्राने दखल घ्यावी, असा इशारा देखील त्यांनी दिला.

मागील 20 दिवसामध्ये घडलेल्या घडामोडीसाठी राज्यातील शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्षाने पाठिंबा दिला आहे. पण तो पाठींबा बाहेरुन दिला असल्याने त्यांनीही या आंदोलनामध्ये सहभागी होण्याचे आवाहन देखील अजित नवले यांनी यावेळी केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.