Pune News: राजीव गांधीच्या सहा वर्षांच्या पंतप्रधानपदाच्या काळाचा मोदींनी बोध घ्यावा- गोपाळ तिवारी

महिलांना स्थानिक स्वराज्य संस्थेत 33 टक्के आरक्षण व तरुणांना मतदानाचा अधिकार 21 वरून 18 वर्षे करण्याचा क्रांतिकारी निर्णय त्यांनी घेतला.

एमपीसी न्यूज – भारतरत्न दिवंगत पंतप्रधान राजीव गांधी यांना मिळालेल्या फक्त 6 वर्षाच्या (1985 ते 91) अल्प कालावधीत त्यांच्या कार्याचा बोध व आदर्श विद्यमान पंतप्रधानांनी घ्यावा, असे आवाहन राजीव गांधी स्मारक समितीचे अध्यक्ष व प्रदेश काँग्रेसचे प्रवक्ते गोपाळ तिवारी यांनी केले आहे.

राजीव गांधी स्मारक समितीच्यावतीने कात्रज येथील राजीव गांधींच्या पुतळ्यास काँग्रेसचे शहराध्यक्ष रमेश बागवे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला.

गोपाळ तिवारी म्हणाले, इंदिराजींच्या अचानक झालेल्या हत्येनंतर (31 ऑक्टोबर 1984) हत्येनंतर काँग्रेस कार्यकारिणीने स्व. राजीवजींवर नेतृत्वाची जबाबदारी सोपवली. 51 व्या वर्षी पंतप्रधानपदी आलेल्या राजीव गांधी यांनी देशाला 21 व्या शतकाची दूरदृष्टी दिली. ‘मेरा भारत महान’ च्या नाऱ्याने देशवासियांच्या भावनेला हात घातला.

‘जगाच्या प्रगतीचा’ वेध घेऊन, तंत्रज्ञानाचा वापर, संगणक, मोबाईल यामध्यमातून सुरू केला. बँकिंग प्रणालीच्या “पहिल्या एटीएमचे” उद्घाटन ही त्यांनी केले. आज या विकासाची फळे देश चाखत आहे.

सामाजिक क्रांतीचे दोन महत्त्वाचे निर्णय त्यांनी घेतले. महिलांना स्थानिक स्वराज्य संस्थेत 33 टक्के आरक्षण व तरुणांना मतदानाचा अधिकार 21 वरून 18 वर्षे करण्याचा क्रांतिकारी निर्णय त्यांनी घेतला. त्यामागे तरुणांमध्ये देश कर्तव्याप्रति गांभीर्य यावे अशी भावना होती.

‘पंचायत राज’च्या माध्यमातून सत्तेचे विकेंद्रीकरण करून ‘गाव, पंचायत व तालुका पातळीवर’ अधिकाराचे वाटप केले असे तिवारी यांनी सांगितले.

‘देश-विघातक शक्तीं’ विरुद्ध ज्यांनी पंगा घेतला, अशाच नेत्यांच्या हत्या झाल्या. त्यामुळे इंदिरा गांधी, राजीव गांधी यांचे बलिदान देशाने कधी ही विसरता कामा नये असे ही गोपाळ तिवारी यांनी स्पष्ट केले.

शहराध्यक्ष रमेश बागवे यांनी स्वर्गीय राजीव गांधी हे जगातील सर्वोत्तम देखण्या व्यक्तिमत्त्वांपैकी एक होते, भारताच्या संगणक क्रांतीचे जनक होते तसेच सामाजिक सलोख्याचे मेरूमणी होते. संगणक देशात लवकर आले नसते तर देश पिछाडीवर राहिला असता असेही त्यांनी सांगितले.

यावेळी एनएसयूआयचे पुणे शहर-जिल्हा अध्यक्ष भूषण रानभरे आभार प्रदर्शन केले. ऊद्यान अधीक्षक डॉ. राजकुमार जाधव, सांस्कृतिक सेल अध्यक्ष विठ्ठल गायकवाड, मार्केट यार्ड ब्लॉक अध्यक्ष रमेश सोनकांबळे, स्मारक समितीचे सदस्य भोला वांजळे, अ‍ॅड. सचिन अडसूळ, संजय अभंग, संतोष गरुड, महेश अंबिके, अशोक काळे, शंकर शिर्के, अविनाश अडसूळ, किशोर रायकर, आबा जगताप, अवधूत मते, प्रकाश अरने, दीपक ओव्हाळ आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.