Pune News : येत्या बुधवारी फेरफार अदालतीचे आयोजन

एमपीसी न्यूज – कोविड 19 चा प्रादुर्भाव कमी झाल्याने या महिन्यात चौथ्या बुधवारी 28 जुलै 2021 रोजी फेरफार अदालत आयोजित करण्याबाबत जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी निर्देश दिले आहेत.

लोकाभिमुख प्रशासनाच्या संकल्पनेतून फेरफार अदालती मंडळ स्तरावर दर महिन्याच्या दुसऱ्या बुधवारी जनतेच्या प्रलंबित साध्या वारस तक्रारी नोंदी निर्गत करण्याच्या सूचना मिळाल्या आहेत. कोविड 19 च्या प्रादुर्भावामुळे मार्च 2021 नंतर अद्याप फेरफार अदालतीचे आयोजन करण्यात आलेले नाही.

आरोग्य विभागाने दिलेल्या निर्देशानुसार कोविड बाबतच्या नियमांचे पालन करुन पुणे जिल्ह्यातील सर्व तालुक्यात क्षेत्रीय स्तरावर जुलै 2021 मधील फेरफार अदालत 28 जुलै 2021 रोजी आयोजित केली जाणार असल्याचे उपजिल्हाधिकारी संजय तेली यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.

पुणे जिल्ह्यात दि. 26 जुलै 2021 अखेर मुदत पुर्ण झालेल्या 12,527 नोंदी प्रलंबित असून या नोंदींमध्ये प्रामुख्याने साध्या, वारस, तक्रार व मुदत पुर्ण झालेल्या सर्व प्रकारच्या नोंदी निर्गतीच्या या कार्यालयाकडून यापूर्वी देखील संबंधितांना सूचना देण्यात आल्या आहेत. या अदालतीच्या दिवशी जास्तीत जास्त नोंदी निर्गत करण्याच्या दृष्टीने फेरफार अदालतीमध्ये प्रयत्न केले जाणार आहेत. फेरफार अदालतीसाठी प्रत्येक मंडळ स्तरावर संपर्क अधिकारी यापूर्वीच नियुक्त केले आहेत. तसेच उपविभागीय अधिकारी तसेच तहसिलदार देखील काही फेरफार अदालतीला उपस्थित राहण्याच्या सूचना यापूर्वीच देण्यात आल्या आहेत.

28 जुलै रोजी होणाऱ्या फेरफार अदालतीमध्ये ज्या कोणाच्या फेरफार नोंदी प्रलंबित आहेत, अशा व्यक्तींनी संबंधित मंडळाच्या मुख्यालयात उपस्थित राहून मंडळ अधिकारी यांना आवश्यक ते कागदपत्र देऊन आपल्या नोंदी निर्गत करुन घ्याव्यात, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.