Pune News : खासदार कोल्हे महापालिकेत ॲक्टिव्ह ! नगरसेवकांचे गाऱ्हाणे मांडले आयुक्तांपुढे

एमपीसी न्यूज : महापालिकेच्या निवडणुका दोन वर्षावर येऊन ठेपल्या आहेत. त्या पार्श्वभुमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी महापालिकेत ॲक्टिव्ह होत विशेष लक्ष द्यायला सुरूवात केली आहे. याच अनुषंगाने पक्षाच्या नगरसेवकांची विशेष बैठक घेत नगरसेवकांचे गाऱ्हाणे महापालिका आयुक्तांपुढे मांडले.

“लोकांची कामे करण्यासाठी नगरसेवकांना पुरेसा निधी द्या, अपुऱ्या निधीमध्ये कशी कामे करायची, अशी विचारणा डॉ. कोल्हे यांनी आयुक्त विक्रम कुमारांकडे केली. दरम्यान, महापालिकेतील बैठका, गाठीभेटीतून डॉ. कोल्हे यांच्या माध्यमातून राष्ट्रवादी कॉंग्रेसने निवडणुकीची तयारी चालविल्याचे बोलले जात आहे.

कोरोनाच्या साथीत महापालिकेचे उत्पन्न घटल्याने सत्ताधारी पक्षासह सर्वच नगरसेवकांच्या वॉर्डस्तरीय निधीला कात्री लावण्यात आली. त्यामुळे नगरसेवकांना त्यांच्या एकूण निधीपैकी 40 टक्के निधी मिळणार असल्याचे स्पष्ट आहे.

त्यातही गेल्या आर्थिक वर्षात झालेल्या कामांची बिले महापालिका प्रशासनाकडून वजा करण्यात येत असल्याने काही नगरसेवकांना नवा पैसाही मिळत नाही. तर काही नगरसेवकांच्या वाट्याला एक-दीड कोटी रुपये येत असल्याचे स्पष्ट आहे.

त्यामुळे नगरसेवकांत नाराजीचा सूर आहे. या पार्श्‍वभूमीवर डॉ. कोल्हे यांनी महापालिकेत येऊन पक्षाच्या सर्व नगरसेवकांशी चर्चा केली. विरोधकांना म्हणजे राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नगरसेवकांना किती निधी मिळाला, त्यातील कामे, त्याचे परिणाम या साऱ्या बाबींवर डॉ. कोल्हे यांनी नगरसेवकांशी चर्चा केली. त्यानंतर आयुक्त कुमार यांची भेट घेतली.

मात्र, सध्या उत्पन्न नसल्याने काटकसर करावी लागत आहे. ज्या प्रमाणात महसूल गोळा होणे अपेक्षित आहेत, तो जमा झालेला नाही. त्यामुळे भविष्यात काही प्रमाणात आर्थिक अडचणी येऊ शकतात. त्यावर खबरदारी म्हणून आता निधी वाढवून देणे शक्‍य नाही, असे कुमार यांनी कोल्हे यांना सांगितले.

याआधी काही दिवसांपूर्वी डॉ. कोल्हे यांनी हडपसर विधानसभा मतदारसंघातील अडचणींबाबत महापालिकेतील अधिकाऱ्यांसमवेत बैठक घेतली. तेव्हाही ते आपल्या काही मागण्यांवर ठाम राहिले होते.

त्यानंतर नगरसेवकांची बैठक आणि आयुक्तांशी चर्चा केल्याने आगामी महापालिका निवडणुकीत डॉ. कोल्हे हे लक्ष घालणार असल्याची चर्चा आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.