Pune News : मुसळधार पावसामुळे महवितरणची यंत्रणा ‘हाय अलर्ट’वर

एमपीसीन्यूज : संततधार व मुसळधार पाऊस तसेच पूरपरिस्थितीच्या पार्श्वभूमिवर वीजपुरवठा खंडित झाल्यास तो सुरळीत करण्यासाठी तसेच विजेचे धोके टाळण्यासाठी महावितरणची यंत्रणा पुणे परिमंडलामध्ये युद्धपातळीवर सज्ज ठेवण्यात आली आहे.

मुसळधार पावसामुळे ज्या भागात पाणी साचेल किंवा वीजयंत्रणेला धोका निर्माण होईल तेथील वीजपुरवठा सुरक्षेच्या कारणास्तव बंद ठेवण्यात येणार आहे. या कालावधीत नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.

पुणे परिमंडलामध्ये गेल्या दोन दिवसांपासून संततधार पाऊस सुरु आहे. शुक्रवारी (दि. 23) पुणे व पिंपरी चिंचवड शहरासह ग्रामीण भागात मुसळधार पाऊस कोसळत होता. दुपारपर्यंत भेरकराईनगर व देहूरोड परिसरातील दोन उच्चदाब वीजवाहिन्यांमध्ये बिघाड झाल्याने भर पावसात दुरुस्ती काम सुरु होते.

उर्वरित भागामध्ये वीजपुरवठा करणाऱ्या सर्व वीजवाहिन्यांचा वीजपुरवठा सुरळीत होता. मात्र, झाडे व फांद्या कोसळल्याने वीजतारा तुटणे व फिडर पिलरमध्ये पाणी शिरणे आदी प्रकारांमुळे वीजपुरवठा खंडित झाल्याच्या वैयक्तिक तक्रारी निवारणाचे काम युद्धपातळीवर सुरु होते.

गुरुवारी (दि. 22) प्रामुख्याने मुळशी व वडगाव मावळ भागात झालेल्या वेगवान वाऱ्यासह मुसळधार पावसामुळे महावितरणचे 12 वितरण रोहित्र. लघुदाबाचे 26 आणि उच्चदाबाचे 11 वीजखांब जमीनदोस्त झाले. मात्र युद्धपातळीवर प्रयत्न करून वीजपुरवठा सुरळीत करण्याचे काम पूर्णत्वास गेले आहे.

खंडित झालेला वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी अभियंते व जनमित्रांची संततधार पाऊस व पूरपरिस्थितीमध्ये खर्‍या अर्थाने कसोटी असते. प्रतिकूल परिस्थितीत रात्री-बेरात्री दुरुस्तीचे काम करण्याचे काम अतिशय आव्हानात्मक असते. वीज दिसत नाही तसेच ती अनुभवी किंवा नवख्या कर्मचार्‍यांना ओळखतही नाही. त्यामुळे धोका सर्वांना सारखाच असतो.

भरपावसात, रात्री-बेरात्री खंडित विजेचे तांत्रिक दोष शोधणारे, दुरुस्तीचे काम करणारे महावितरणचे अभियंते व कर्मचाऱ्यांनी सुरक्षेबाबत सजग राहून सर्वप्रकारे काळजी घ्यावी असे आवाहन मुख्य अभियंता श्री. सचिन तालेवार यांनी केले आहे.

संततधार पाऊस व पूरपरिस्थितीच्या पार्श्वभूमिवर सुरळीत वीजपुरवठ्यासाठी पुणे परिमंडलातील उपकेंद्र आणि कार्यालयांमध्ये आवश्यक यंत्रसामग्रीचा पुरेसा साठा करून ठेवण्यात आला आहे. यामध्ये विजेचे खांब, रोहित्र, वीजतारा, ऑईल व इतर तांत्रिक साहित्याचा समावेश आहे. यंत्रणेच्या दुरुस्तीसाठी नियुक्ती करण्यात आलेल्या सर्व एजन्सीजना आवश्यक मनुष्यबळ, सामग्री व वाहनांसह तयार राहण्याचा सूचना देण्यात आल्या आहेत.

वीजपुरवठा खंडित झाल्यास सर्वप्रथम प्राधान्याने पर्यायी व्यवस्थेतून वीजपुरवठा सुरळीत करण्यात येणार आहे. तसेच विभागस्तरीय दैनंदिन नियंत्रण कक्षाकडून वीजपुरवठ्याबाबत माहिती, वीजयंत्रणेचे नुकसान तसेच इतर आवश्यक माहितीचा आढावा परिमंडलस्तरावर घेण्यात येत आहे.

-MPC-BOTTOM-BANNER-I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

.