Pune News : महावितरणच्या 2 लाखांवर ग्राहकांचा वीजमीटर रिडींग पाठविण्यास प्रतिसाद

एमपीसी न्यूज – स्वतःहून मीटरचे रिडींग पाठविण्यास वीजग्राहकांकडून प्रतिसाद वाढत आहे. गेल्या एप्रिल महिन्यात 2 लाख 2 हजार 742 ग्राहकांनी मोबाईल अ‍ॅप, वेबसाईट व ‘एसएमएस’द्वारे मीटरचे रिडिंग महावितरणकडे पाठविले आहे. यामध्ये पुणे परिमंडलातील सर्वाधिक 49950 तर त्यापाठोपाठ कल्याण परिमंडलातील 28916 वीजग्राहकांचा समावेश आहे.

राज्याचे ऊर्जामंत्री ना. डॉ. नितीन राऊत यांच्या सूचनेनुसार वीजग्राहकांना स्वतःहून मीटर रिडींग पाठविण्याची सोय महावितरणने उपलब्ध करून दिली आहे. वीजग्राहकांचा प्रतिसाद पाहून ही सोय कायम ठेवण्यासोबतच मीटर रिडींग पाठविण्याची मुदत देखील चार दिवस करण्यात आली आहे. दरम्यान कोरोना प्रादुर्भावाच्या आपत्कालिन परिस्थितीत आता मोबाईल ‘एसएमएस’द्वारे देखील मीटर रिडींग पाठविण्याची खास सोय उपलब्ध आहे. याआधी मागील मार्च महिन्यात 1 लाख 35 हजार 261 ग्राहकांनी मीटर रिडींग पाठविले होते. या ग्राहकांमध्ये एप्रिल महिन्यात 67 हजार 481 संख्येने वाढ झाली आहे.

प्रत्येक महिन्याच्या 1 ते 25 तारखेपर्यंत एका निश्चित तारखेला लघुदाब वीजजोडणीच्या मीटरचे फोटो रिडींग घेण्यात येत आहे. ग्राहकांना मीटरच्या रिडींगसाठी दरमहा निश्चित तारखेच्या एक दिवसआधी रिडींग पाठविण्याची ‘एसएमएस’द्वारे विनंती करण्यात येत आहे. तेव्हापासून चार दिवसांपर्यंत ग्राहकांना स्वतःहून मोबाईल अ‍ॅप,  http://www.mahadiscom.in  किंवा ‘एसएमएस’द्वारे मीटरमधील केडब्लूएच (kWh) रिडींग पाठविता येत आहे.

गेल्या एप्रिल महिन्यात राज्यातील 2 लाख 2 हजार 742 ग्राहकांनी स्वतःहून मीटर रिडींग पाठविलेले आहे. यात पुणे परिमंडलमधील 49950, कल्याण- 28916, नाशिक- 22330, भांडूप- 18093, बारामती- 13733, जळगाव- 10877, औरंगाबाद- 10100, कोल्हापूर- 8470, नागपूर- 7269, अकोला- 7180, लातूर- 6085, अमरावती- 5662, कोकण- 4223, गोंदिया- 3464, नांदेड- 3262 व चंद्रपूर परिमंडलातील 3138 वीजग्राहकांचा समावेश आहे.

महावितरण मोबाईल अ‍ॅपमध्ये ‘सबमीट मीटर रिडींग’वर क्लिक करून मीटरमधील केडब्लूएच (kWh) रिडींगचा (केडब्लू किंवा केव्हीए वगळून) फोटो काढावा व सबमीट करावे. तसेच ग्राहक क्रमांकासोबत ग्राहक रजिस्ट्रेशन व लॉगीन करून www.mahadiscom.in वेबसाईटवरून फोटो व मीटर रिडींग अपलोड करता येईल. यासोबतच ‘एसएमएस’द्वारे मीटर रिडींग पाठविण्यासाठी MREAD<स्पेस><12 अंकी ग्राहक क्रमांक><स्पेस><KWH रिडींग 8 अंकापर्यंत> असा ‘एसएमएस’ ९९३०३९९३०३ या मोबाईल क्रमांकावर पाठविल्यास मीटर रिडींग सबमीट करता येईल.

वीजग्राहकांना स्वतःहून रिडींग पाठविल्यास मीटरकडे व रिडिंगकडे नियमित लक्ष राहील. वीजवापरावर देखील नियंत्रण राहील. रिडींगनुसार बिल आल्याची खात्री करता येईल. मीटर सदोष किंवा नादुरुस्त असल्यास त्याची तत्काळ तक्रार करता येईल. वीजबिलांबाबत कोणत्याही तक्रारी उद्भवणार नाहीत. रिडींग अचानक वाढल्यास त्याची कारणे शोधता येईल. शंका समाधानासाठी तक्रार करता येईल. रिडींग पाठविण्यासाठी प्रत्येक महिन्यात केवळ दोन ते तीन मिनिटांचा कालावधी लागतो. यासह विविध फायद्यांमुळे वीजग्राहकांनी दरमहा मीटर रिडींग पाठवावे असे आवाहन महावितरणने केले आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.