Pune News : महापालिका प्रशासनाचे कोविड केअर सेंटर सुरू करण्याकडे दुर्लक्ष; शिवसेनेचा आरोप

एमपीसी न्यूज – पुणे शहरामध्ये कोरोनाच्या संकटाने मोठे थैमान मांडले आहे. रोज साधारण पाच हजार ते सहा हजार पॉझिटिव्ह रुग्ण शहरात सापडत आहेत. मात्र वारंवार मागणी करूनही महापालिका प्रशासन शहराच्या विविध भागात सीसीसी सेंटर (कोविड केअर सेंटर) सुरु करण्याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप महानगरपालिकेतील शिवसेनेचे गटनेते पृथ्वीराज सुतार यांनी केला आहे.

शहरात वाढत चाललेला कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी विविध ठिकाणी तातडीने सीसीसी सेंटर सुरू करण्याची मागणी त्यांनी आयुक्तांकडे केली आहे.

_MPC_DIR_MPU_II

सुतार यांनी म्हटले आहे की, सीसीसी सेंटर त्वरीत सुरू करावेत, ऑक्सिजन बेड्स व व्हेंटीलेटर बेड्सची संख्या वाढवावी याबाबत व रूग्णांच्या गैरसोईबद्दल आम्ही साधारण एक महिन्यापूर्वी सुध्दा आयुक्तांकडे लेखी निवेदनाद्वारे मागणी केली होती, परंतु मागच्या वर्षी प्रमाणे सर्व ठिकाणी सीसीसी सेंटर अद्यापही सुरु झाले नाहीत. बेड्स मागच्या वर्षीच्या तुलनेत कमी पडत आहेत, योग्य त्या सुविधा वेळेमध्ये मिळत नसल्यामुळे पॉझिटिव्ह रुग्ण वाढत आहेत तसेच मृत्यूची संख्या सुद्धा वाढत चालली आहे.

कोरोनाने शहरात थैमान घातले असताना, अजूनही प्रशासन गंभीर नाही का? अजून किती पुणेकरांच्या जिवाशी आपण खेळणार आहात ? असा सवाल सुतार यांनी उपस्थित केला आहे. मागच्या वर्षी सर्वत्र सीसीसी सेंटर सुरु होते. सूक्ष्म लक्षणे असलेले रुग्ण लगेच त्याठिकाणी क्वारंटाईन होत होते व त्यामुळे कोरोना चा प्रसार रोखला जात होता. मात्र आता एवढ्या झपाट्याने रुग्ण वाढत असतानाही पालिका प्रशासनाला जाग येत नसल्याचे त्यांनी म्हटले आहे.

प्रशासनाने आपल्या कामाचा प्राधान्यक्रम निश्चित करून सर्व खातेप्रमुखांची बैठक घेऊन प्रत्येक अधिकाऱ्याला जबाबदारी देऊन कामांचे वाटप करावे. तसेच आपण जे बेड्स मागणीसाठी हेल्पलाईन नंबर दिले आहेत त्या हेल्पलाईनची व्यवस्था कुचकामी ठरली असून त्या व्यवस्थेचा फायदा कमी व नुकसानच जास्त होत आहे. आपण बेड्स च्या मागणीबाबत त्या त्या सरकारी हॉस्पिटलची स्वतंत्र हेल्पलाईनची व्यवस्था करावी. ज्यामुळे खरी व योग्य ती माहिती बेडबाबत मिळण्यास मदत होईल. तसेच रेमडिसिविर इंजेक्शनची खरेदी मनपाने तातडीने करून, पुणेकरांना मोफत ती इंजेक्शन उपलब्ध करुन दयावेत, अशी मागणी पृथ्वीराज सुतार यांनी केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.