Pune News : महापालिकेच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांचे कुटुंबीय अनुदानापासून अद्याप वंचित

एमपीसी न्यूज – कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांच्या सेवेत मृत्युमुखी पडलेल्या महापालिकेच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांचे कुटुंबीय अनुदानापासून अद्याप हि वंचितच आहेत. कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या वारसांना 50 लाखांचे विमाकवच अथवा सानुग्रह अनुदान देण्याचे आदेश राज्य शासनाने दिले आहेत. मात्र, महापालिका प्रशासनाने अद्याप याबाबत निर्णय घेतलेला नाही.

महापालिकेच्या 835 कर्मचाऱ्यांना आतापर्यंत कोरोनाची लागण झाली आहे. त्यामधील 88 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यात 81 कायमस्वरूपी कर्मचारी असून, 7 कंत्राटी कर्मचारी आहेत. यातील 3 कर्मचारी केंद्राच्या 50 लाख रुपयांच्या विमा योजनेस पात्र झाले आहेत. तर, पालिकेकडून टप्प्याटप्प्याने उर्वरित कर्मचाऱ्यांना 25 लाखांची मदत तसेच एका वारसाला महापालिकेत नोकरी दिली जात आहे. मात्र, अद्याप कंत्राटी कर्मचाऱ्यांना मदत देण्यात आलेली नाही.

केंद्र शासनाने मार्च 2020 मध्ये आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी विमाकवच योजना लागू केली. त्यानुसार कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना आणि रुग्णालयात काम करणारे डॉक्टर अथवा वैद्यकीय कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाल्यास 50 लाखांचा विमा मिळणार होता.

त्यानंतर कोरोनाबाधितांचे सर्वेक्षण, शोध, चाचणी केंद्र अशा ठिकाणी काम करणाऱ्यांसाठी हे विमाकवच जाहीर केले होते. महापालिकेकडूनही या दोन्ही योजनांची अंमलबजावणी केली जाते. मात्र, आता शासकीय कर्मचाऱ्यांबरोबरच कंत्राटी आणि ठेकेदारांकडून रोजंदारीवर घेतलेल्या कर्मचाऱ्यांनाही प्रत्येकी 50 लाखांचा विमा जाहीर झाला आहे.

राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांनी स्वनिधीतून शासनाच्या निकषानुसार मरण पावलेल्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना ही देण्याचे आदेश राज्य शासनाने दिले आहेत, राज्यातील “अ” वर्ग आणि ” वर्गाच्या महापालिकांनी या निर्णयाची अंमलबजावणी करावी, असे या आदेशात म्हटले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.