Pune News : तिसऱ्या लाटेचा संभाव्य धोका लक्षात घेता खाजगी रुग्णालयातील 50 टक्के बेड पालिका ताब्यात ठेवणार

एमपीसी न्यूज – कोरोनाची तिसरी लाट लवकरच येण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्ती केली आहे. ही लाट दुसऱ्या लाटेपेक्षा अधिक घातक असण्याची शक्यता असल्याने पालिका प्रशासनाकडून पूर्व नियोजन करण्यात येत आहे. त्यामुळे खासगी रुग्णालयांतील 50 टक्के बेड महापालिका ताब्यातच ठेवणार आहे. त्यामुळे कोरोनाच्या संभाव्य स्थितीत रुग्णांवर त्वरित उपचार सुरु करता येणार आहेत.

फेब्रुवारीमध्ये कोरोना दुसरी लाट आली. या लाटेत पहिल्या लाटेपेक्षा बाधितांची संख्या, सक्रीय बाधित, गंभीर रुग्ण, ऑक्सिजन लागणाऱ्यांची संख्या वेगाने वाढली. त्यामुळे शहरात बेडची टंचाई निर्माण होऊन नागरिकांना बेडसाठी वणवण करावी लागली . या काळात बेडची उपलब्धता करताना महापालिकेच्या अक्षरश: नाकीनऊ आले.

यामुळे महापालिकेने खासगी रुग्णालयांतील सुमारे 80 टक्के बेड कोरोनाबाधितांसाठी नियंत्रणाखाली आणले. त्यामुळेच सुमारे 10 ते 11 हजार बेडची व्यवस्था झाली. यात दोन जम्बो कोविड, महापालिकेची आणि खासगी रुग्णालये आणि त्यामधील साध्यापासून ते व्हेंटिलेटर बेडचा समावेश होता.

मे च्या आठवड्यापासून बाधितांची संख्या कमी होत आहे. त्यामुळे महापालिकेने मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात आणि जूनमध्ये खासगी रुग्णालयांतील ताब्यात घेतलेल्या बेडपैकी 40 टक्के बेड पुन्हा त्यांच्या ताब्यात दिले. मात्र, ते करताना पुन्हा एकदा आपत्कालिन परिस्थिती उद्भवल्यास ताब्यात घेऊ शकतो, अशी अट ठेवण्यात आल्याचे महापालिकेकडून सांगण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.