Pune News: शहरात विकास कामे सुरू करू द्या, महापालिकेचे राज्य शासनाला पत्र 

एमपीसी न्यूज – पुणे शहरातील विकास कामे सुरू करू द्या, अशी मागणी महापालिकेतर्फे राज्य शासनाकडे करण्यात आली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ही विकासकामे थांबविण्यात आलेली आहेत. या विकास कामांसाठी आवश्यक महसूल महापालिका स्तरावर उभारला जाईल, असेही पत्रात म्हटले आहे. 

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अत्यावश्यक विकास कामांवर केवळ 33 टक्केच खर्च करावा, असे राज्य शासनातर्फे आदेश देण्यात आले आहेत. मागील साडेचार महिन्यांत कोरोना संदर्भातील उपाययोजनांवरील खर्च आणि पावसाळी कामे वगळता इतर कोणत्याही नव्या विकास कामांच्या निविदा काढण्यात आलेल्या नाहीत.

मिळकत करातून व अन्य स्त्रोतातून जुलै अखेरपर्यंत महापालिकेने दीड हजार कोटी रुपयांचे उत्पन्न मिळविले आहे. पुढील सहा ते सात महिन्यांत  महापालिकेला आणखी 5 हजार कोटी रुपये उत्पन्न मिळेल, असा विश्वास आहे.

2020-21 च्या अंदाजपत्रकात सुचविलेल्या विकास कामांच्या निविदा काढण्यास मंजुरी द्यावी, अशी विनंतीही राज्य शासनाकडे करण्यात आली आहे, असे स्थायी समितीचे अध्यक्ष हेमंत रासने यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. दरम्यान, निविदा प्रक्रिया राबविण्यात आली तरी, राज्य शासनाची मान्यता आल्यावरच  विकास कामांची वर्क ऑर्डर काढली जाणार असल्याचे प्रशासनाने म्हटले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.