Pune News : महिलांच्या सुरक्षिततेसाठी महापालिकेचा ‘विशेष कृती आराखडा’: महापौर मोहोळ

एमपीसी न्यूज – शहर आणि परिसरात गेल्या काही दिवसांत घडलेल्या महिला अत्याचारांच्या घटनांची महापालिका स्तरावरही गांभीर्याने दखल घेण्यात आली असून या संदर्भात पुणे महापालिका पुणे पोलिसांसमवेत ‘विशेष कृती आराखडा’ तातडीने तयार करणार असून त्याची अंमलबजावणीही वेगाने करण्यात येईल, अशी माहिती महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली.

गेल्या काही दिवसांत पुणे आणि परिसरात घडलेल्या महिला अत्याचाराच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या पुढाकारातून महानगरपालिकेत पोलीस दलासमवेत बैठक आयोजित केली होती. त्यानंतर महापौर बोलत होते. या बैठकीस पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, सह पोलीस आयुक्त रविंद्र शिसवे, महापालिका आयुक्त विक्रम कुमार, पुणे महानगरपालिकेचे सर्व पक्षनेते, तसेच महापालिका अधिकारी उपस्थित होते. या बैठकीमध्ये, महिलांच्या सुरक्षेसंदर्भात पुणे महापालिका आणि पोलीस प्रशासन यांनी एकत्रितपणे कृती आराखडा तयार करण्याचा निर्णय घेण्यात आला. विविध निर्णयांसोबतच क्षेत्रीय कार्यालयानिहाय पथके तयार करण्याचा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे.

महापौर मोहोळ म्हणाले, ‘सद्यस्थितीमध्ये नोकरी, व्यवसायात महिला वर्गाचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढत आहे. यामुळे नोकरी, व्यवसायानिमित्त महिलांना रात्री अपरात्री प्रवास करावा लागत असल्याने अत्याचाराच्या घटना घडत आहेत, असे निदर्शनास आले आहे. याला आळा घालण्यासाठी या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. पुणे महानगरपालिकेच्या माध्यमातून पोलीस स्टेशनच्या सूचनेनुसार शाळेची मैदानी, उद्याने, रेल्वे स्टेशन परिसर, स्वारगेट बस स्थानक, शिवाजीनगर बस स्थानक परिसरात सीसीटीव्ही कॅमेरा तसेच विद्युत व्यवस्था उपलब्ध करून देण्यात येणार आहे. तसेच खाजगी आणि सरकारी शाळांमध्ये संस्कार वर्ग, महिलांसाठी स्वसंरक्षण प्रशिक्षण, स्पर्शज्ञान यासाठी विशेष प्रशिक्षण राबविण्यात येणार आहे.

‘प्रवासी वाहतूक करणाऱ्या ओला, उबर कॅब आणि रिक्षा, स्कूल व्हॅन यांच्यासाठी विशेष नियमावली तयार करून राबविण्यात येणार आहे. तसेच सार्वजनिक वाहतुक यंत्रणेत महिलांच्या सुरक्षिततेसाठी पीएमपीएमएल त्याचबरोबर आरटीओची मदत घेतली जाणार आहे. तसेच लॉज, हॉटेल यांच्याकरता देखील कडक नियमावली तयार करून त्याची अंमलबजावणी करण्यात येईल’, असेही महापौर मोहोळ म्हणाले.

काय असेल कृती आराखड्यात?
■ परप्रांतीय, फुटपाथवर राहणाऱ्या लोकांची माहिती संकलित करणार
■ प्रवासी वाहतूक करणाऱ्या ओळ उबर कॅब आणि रिक्षा, स्कूल व्हाॅन यांच्याकरता विशेष नियमावली तयार करणार
■ हॉटेल-लॉज यांच्यासाठी देखील कडक नियमावली करणार
■ स्टेशन, बस स्थानके, उद्याने, मैदाने याठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवणार आणि दिव्यांची व्यवस्था करणार

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.