Pune News: तीन महिन्यापूर्वी झालेल्या शिवीगाळीच्या रागातून खराडीतील ‘त्या’ सराईत गुन्हेगाराचा खून

एमपीसी न्यूज – खराडी परिसरातील एका मोकळ्या मैदानावर आज पहाटेच्या सुमारास सराईत गुन्हेगार शैलेश घाडगे (वय 23) याचा खून करण्यात आला होता. पोलिसांनी या प्रकरणाचा छडा लावला असून अहमदनगर येथून चौघांना अटक केली आहे. तीन महिन्यापूर्वी मयत शैलेश घाडगे याने शिवीगाळ केल्याचा राग मनात धरून आरोपींनी त्याचा खून केला.

राजू तुकाराम अस्वले (वय 23), सुनील रवींद्र पाटील (वय 24), आकाश अनिल देवकर (वय 25) आणि  विशाल रमेश भादवे (वय 25) अशी अटक करण्यात आलेल्या चौघांची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत शैलेश आणि आरोपी राजू यांच्यात 2016 मध्ये भांडणे झाली होती. याप्रकरणी राजू अस्वले याच्या विरोधात गुन्हाही दाखल झाला होता. तीन महिन्यापूर्वी शैलेश घाडगे याने राजू अस्वले यांना शिवीगाळ केली होती. याचा राग मनात धरून अटक केलेल्या आरोपीने संगणमत करून रविवारी मध्यरात्री शैलेश घाडगे याचा निर्घृण खून केला.

चंदन नगर पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करून तपासाला सुरुवात केली असता त्यांना हा खून राजू असले आणि त्याच्या साथीदारांनी केल्याची माहिती मिळाली होती. तसेच हे सर्व आरोपी अहमदनगरला गेले असल्याची माहिती मिळाली होती. त्यानंतर चंदनगर पोलिसांचे एक पथक अहमदनगर येथे गेले आणि वरील आरोपींना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे केलेल्या अधिक चौकशीत त्यांनी खून केल्याची कबुली दिली. त्यानंतर आज रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास या सर्व आरोपींना अटक केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.