Pune News : मुंढव्यात दुचाकीचा धक्का लागल्याच्या कारणावरून एकाचा खून

एमपीसी न्यूज –  दुचाकीचा धक्का लागल्याच्या कारणावरून झालेल्या वादानंतर एका तीस वर्षीय तरुणाचा खून करण्यात आला आहे. हडपसर मुंढवा रस्त्यावर मंगळवारी रात्री आठच्या सुमारास ही घटना घडली. मुंढवा पोलिस ठाण्यात या प्रकरणी दोन तरुणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अशोक शंकर राव (वय 30) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी सागर शंकर राव (वय 20) यांनी फिर्याद दिली आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अशोक शंकर राव हा मुंढवा येथील भोईराज सोसायटीमध्ये राहतो. मिळेल ते काम करून आपली उपजीविका तो भागवतो. मंगळवारी सकाळी दहाच्या सुमारास अशोक काम शोधण्यासाठी घराबाहेर पडला होता. त्यानंतर पायी घरी परत येत असताना रात्री आठच्या सुमारास त्याला एका दुचाकीचा धक्का लागला. दुचाकीचा धक्का लागल्याने त्याने दुचाकीवरील दोघांना बडबड केली. याच रागातून दोघांमध्ये भांडण झाले.

 

त्यानंतर रागाच्या भरात त्यांनी अशोक राव याला हाताने मारहाण केली. त्यातील एकाने अशोक याच्या डोक्यात वार केल्याने तो गंभीर जखमी झाला आणि त्यातच त्याचा मृत्यू झाला. दरम्यान घटनेची माहिती मिळताच मुंढवा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. खून केल्यानंतर आरोपी घटनास्थळावरून पळून गेले. मुंढवा पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.