Pune News : नमोज हँड (Namo’s Hand) हे अवजार सर्व स्वच्छता सेवकांना उपलब्ध केले जावे – चंद्रकांत पाटील

एमपीसी न्यूज – स्वच्छता सेवकांना काम करताना अनेक अडचणी येतात, अनेकदा रस्त्यावरील घाण साफ करताना त्यांना ती हाताने किंवा पुठ्ठा वा अन्य तत्सम गोष्टींचा वापर करुन गोळा करावी लागते. सुधीर बर्वे यांनी यावर उपाय म्हणून निर्मिती केलेल्या  नमोज हँड (Namo’s hand) या अवजाराचा सर्व स्वच्छता सेवकांनी वापर करावा व हे अवजार त्यांना उपलब्ध करुन दिले जावे यासाठी आपण प्रयत्न करु, असे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील म्हणाले.

कोथरूडला आयोजित एका कार्यक्रमात क्रिएटिव्ह फाउंडेशनचे अध्यक्ष संदीप खर्डेकर यांनी हे अवजार चंद्रकांत पाटील यांना भेट दिले त्यावेळी पाटील यांनी हे मत व्यक्त केले.

सुधीर बर्वे हे लंडनमध्ये राहात होते, मात्र त्यांचे मन तेथे रमले नाही आणि मातृभूमीच्या ओढीने ते पुण्यात परतले. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या स्वच्छता अभियानाने ते प्रभावित झाले आणि त्यांनी या क्षेत्रात काम करण्याचे ठरवले याचा आदर्श सर्वांनी घ्यावा, असे संदीप खर्डेकर म्हणाले.

यावेळी नगरसेविका मंजुश्री खर्डेकर, नगरसेवक दीपक पोटे, भाजप कोथरूड मंडल अध्यक्ष पुनीत जोशी आदी उपस्थित होते.

सुधीर बर्वे म्हणाले की मी अनेक ठिकाणी स्वच्छता सेवकांना हाताने कचरा / घाण गोळा करताना बघून व्यथित झालो आणि त्यातून अश्या प्रकारची निर्मिती करण्याचे ठरवले. हे अवजार वापरण्यास सुलभ असून याद्वारे स्वच्छता सेवकांचे काम सुलभ होइल व प्रत्यक्ष हाताने कचरा गोळा करण्याची गरज नसल्याने त्यांचे आरोग्य रक्षण देखील होइल. हे अवजार मनपा, जिल्हा परिषद, ग्राम पंचायत येथील सेवकांसाठी माफक किमतीत उपलब्ध केले जाईल असेही त्यांनी स्पष्ट केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.