Pune News : राजकारणाचे हिंदूकरण आणि हिंदूंच्या सैनिकीकरणाशिवाय राष्ट्रनिर्मिती शक्य नाही : स्वामी गोविंद देवगिरी महाराज

एमपीसी न्यूज : राजकारणाचे हिंदूकरण आणि हिंदूंचे सैनिकीकरण केल्याशिवाय राष्ट्रनिर्मिती होऊ शकणार नाही. जगाला हेवा वाटावा असे भव्य राम मंदिराच्या भव्यतेला सीमा असेल पण दिव्यतेला नाही, असे मत अयोध्या राम मंदिर ट्रस्टचे कोषाध्यक्ष स्वामी गोविंद देवगिरी महाराज यांनी केले.

कोथरूड येथील यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात माधव भांडारी लिखीत ‘अयोध्या’ पुस्तकाच्या विमोचन कार्यक्रमात ते बोलत होते. याप्रसंगी व्यासपीठावर महापौर मुरलीधर मोहोळ, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, भाजप शहराध्यक्ष जगदिश मुळीक, स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने यांच्यासह अन्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

स्वामी गोविंद देवगिरी महाराज म्हणाले, प्रभु रामचंद्र हे राष्ट्रीय पुरूष होते. त्यांची मंदिरे अनेक असतील पण जन्मभूमी ही एकच आहे. शेकडो वर्षांच्या संघर्षानंतर मंदिराचे स्वप्न साकार होत आहे. त्यामुळे ते मंदिर राष्ट्रमंदिर असेल, कदाचित मंदिराच्या भव्यतेला सीमा असेल पण भव्यतेला नाही. स्वामी विवेकानंद म्हणायचे की महाभारत आणि रामायणातील सद्गुणांचा पुतळा छत्रपती शिवाजी महाराज आहेत. परंतु तेच शिवाजी घडले ते रामायण आणि महाभारतातील शिकवणुकीमुळे. राममंदिराच्या निर्माणासाठी 130 कोटी जनतेकडून निधी संकलित करावे लागणार आहे. त्यासाठी शिवरायांच्या मावळ्यांसारखे न झुकणारे आणि विकले न जाणारे सैनिक हवे आहेत. आगामी राष्ट्रव्यापी मोहीमेतून निधी संकलन करत आहोत त्यामध्ये सर्वांनी दान करावे आणि ‘अयोध्या’ हे आंदोलनाचा इतिहास सांगणारे पुस्तक विकत घ्यावे असे आवाहन त्यांनी केले.

चंद्रकांत पाटील म्हणाले, परकीय आक्रमकांनी धर्म आणि स्त्रीयांवर हल्ले केले होते. मंदिरे तोडली स्त्रियांना भ्रष्ट केले. त्यामुळे राममंदिर हे आमच्या अस्मिता आणि स्वाभिमानावर झालेल्या हल्ल्याचं प्रत्युत्तर आहे. त्यामुळे राष्ट्रनिर्माणाची सुरवात राममंदिरापासून करत आहोत. एक लाखाहून जास्त निधी देणाऱ्यांना लेखक भांडारी यांच्या स्वाक्षरीचे एक पुस्तक मोफत दिले जाईल.

यावेळी महापौर मुरलीधर मोहोळ यांच्यासह अन्य मान्यवरांनी मनोगतपर भाषणे केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संदिप खर्डेकर यांनी केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.