Pune News: यशस्वी कौशल्य संस्थेला राष्ट्रीय कौशलाचार्य पुरस्कार

उद्योगजगतामधील गुंतवणूक आकर्षित करण्यासाठीही चालना मिळत आहे. आत्मनिर्भर भारतासाठी युवकांनी कौशल्य विकासाची कास धरली पाहिजे असेही डॉ. महेंद्रनाथ पांडे यांनी सांगितले.

एमपीसी न्यूज – केंद्रीय कौशल्य विकास व उद्योजकता मंत्रालयाच्यावतीने राष्ट्रीय कौशलाचार्य पुरस्कार पुण्यातील ‘यशस्वी अकॅडमी फॉर स्किल्स’ या संस्थेला देण्यात आला. केंद्रीय कौशल्य विकास व उद्योजकता मंत्री डॉ. महेंद्रनाथ पांडे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा पुरस्कार वितरण सोहळा ऑनलाइन पद्धतीने झाला. अप्रेंटीस योजनेच्या अंमलबजावणीत राष्ट्रीय पातळीवर उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल प्रथम क्रमांकाचा ‘राष्ट्रीय कौशलाचार्य’ पुरस्कार यावेळी ‘यशस्वी’ संस्थेला प्रदान करण्यात आला.

याप्रसंगी मार्गदर्शनपर भाषणात बोलताना डॉ. महेंद्रनाथ पांडे म्हणाले की, देशाच्या विकासात कौशल्य प्रशिक्षणाचे अनन्यसाधारण महत्व असून कौशल्य विकास प्रशिक्षण देणाऱ्या संस्थांच्या योगदानामुळे युवापिढी कुशल मनुष्यबळ म्हणून तयार होत आहे. ज्यामुळे उद्योगजगताच्या प्रगतीला वेग मिळत आहे.

उद्योगजगतामधील गुंतवणूक आकर्षित करण्यासाठीही चालना मिळत आहे. आत्मनिर्भर भारतासाठी युवकांनी कौशल्य विकासाची कास धरली पाहिजे असेही डॉ. महेंद्रनाथ पांडे यांनी सांगितले.

राष्ट्रीय कौशलाचार्य पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल आपल्या भावना व्यक्त करताना ‘यशस्वी’ संस्थेचे अध्यक्ष विश्वेश कुलकर्णी यांनी सांगितले की, अनुभव नाही म्हणून नोकरी नाही आणि नोकरी नाही म्हणून कामाचा अनुभव नाही या दृष्टचक्रात अडकलेल्या युवकांना अप्रेन्टिस योजनेमुळे प्रत्यक्ष कंपनीत ऑन द जॉब ट्रेनिंग करण्याची संधी उपलब्ध होत असून युवक रोजगारक्षम होत आहेत.

देशभरातील तेवीस राज्यात विस्तार असलेल्या ‘यशस्वी’ संस्थेच्या वतीने सुमारे 700 नामांकित औद्योगिक कंपन्यांमधून 55 हजार प्रशिक्षणार्थी प्रत्यक्ष कंपनीत ऑन द जॉब ट्रेनिंग पद्धतीने कार्यरत आहेत. या प्रशिक्षणार्थ्याना कंपनीतर्फे दरमहा विद्यावेतन तसेच कँटीन व वाहतूक सुविधाही उपलब्ध करून देण्यात येते.

विशेष बाब म्हणजे ‘यशस्वी’ संस्था अप्रेन्टिस योजनेत प्रामुख्याने ग्रामीण भागातील गरीब कुटुंबातील गरजू व होतकरू युवक युवतींना प्रवेश देतात. ‘यशस्वी’ संस्थेचे अनेक विद्यार्थी सध्या नामवंत कंपन्यांमधून ट्रेनी इंजिनिअर म्हणून नोकरीत रुजू झाले आहेत.

या पुरस्कार सोहळ्यात केंद्रीय कौशल्य विकास व उद्योजकता मंत्रालयाच्या नवीन संकेतस्थळाचे उद्घाटनही केंद्रीय कौशल्य विकास व उद्योजकता मंत्री डॉ. महेंद्रनाथ पांडे यांच्या हस्ते करण्यात आले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.