Pune News: पुण्यातील टेकड्या वाचविण्याची राष्ट्रवादी व भाजपची मागणी

एमपीसी न्यूज – पुणे शहरातील टेकड्या वाचविण्यात याव्यात, अशी आग्रही मागणी राष्ट्रवादी आणि भाजपतर्फे राज्य शासनाला करण्यात आली आहे.

पुणे शहराच्या जुन्या हद्दीच्या विकास आराखड्याला 2017 मध्ये मान्यता देताना डोंगरमाथा-डोंगरउतार बाबतचा निर्णय प्रलंबित ठेवण्यात आला होता. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शासनाच्या काळात अखेरपर्यंत त्यावर निर्णय झाला नाही. होऊ शकला नाही. सध्या डोंगरमाथा-डोंगरउतारावर चार टक्के बांधकामाला परवानगी आहे. संपूर्ण क्षेत्र निवासी करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत, असे पुणे महापालिकेचे माजी विरोधी पक्षनेते उज्ज्वल केसकर व सुहास कुलकर्णी यांनी सांगितले.

नगरविकास विभागाच्या प्रधान सचिवांना यासंबंधीचे पत्र देण्यात आले आहे. समाविष्ट 23 गावांतील  बीडीपीच्या जागांसह जुन्या पुण्याच्या हद्दीत टेकड्यांवर निवासीकरणाला परवानगी देऊ नये, अशी मागणी करण्यात आली आहे.

टेकड्या वाचविल्याच पाहिजे, अशी सुरुवातीपासूनची भूमिका राज्यसभेच्या खासदार अ‍ॅड. वंदना चव्हाण यांनी लावून धरली आहे. नगरविकास विभागाच्या प्रधान सचिवांना याप्रकरणी पत्र देण्यात आले आहे. टेकड्या उद्ध्वस्त करणाऱ्यांना कठोर दंड करा, अशी मागणीही चव्हाण यांनी केली आहे.

एक लाखांहून अधिक नागरिकांनी टेकड्या वाचविण्याची मागणी केली आहे. तर, वर्षानुवर्षे नागरिक बीडीपी झोनमध्ये राहत आहेत. ग्रामपंचायत काळापासून त्यांचे वास्तव्य आहेत. त्याबाबत राज्य शासन काय निर्णय घेणार याकडे लक्ष लागले आहे.

बीडीपीच्या जागेतच शिवसृष्टी उभारणार असल्याचे आश्वासन तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले होते. आता काँग्रेस-राष्ट्रवादी-शिवसेना महाविकास आघाडीचे सरकार काय निर्णय घेणार, याकडे लक्ष लागले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.