Pune News : राष्ट्रवादीच्या वतीने महिला पोलिसांचा ‘कोरोनामुक्त गुढी’ देऊन सन्मान

एमपीसी न्यूज – कोरोना काळात उल्लेखनीय कामगिरी बजवणाऱ्या 23 महिला पोलिसांना कोरोनामुक्त गुढी देऊन सन्मान करण्यात आला. राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने लॉकडाऊन काळात कर्तव्य बजावणाऱ्या महिला पोलिसांचे मनोधैर्य वाढवण्यासाठी हा सन्मान करण्यात आला, अशी माहिती राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे सरचिटणीस गिरीश गुरनानी यांनी दिली. 

गुढीपाडवा आणि मराठी नववर्षानिमित्त कोथरूड शास्त्रीनगर पोलीस स्टेशन येथे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मेघश्याम डांगे आणि पोलीस निरीक्षक बाळासाहेब बडे यांच्या हस्ते हा सन्मान करण्यात आला. कोरोनामुक्त गुढी आणि सन्मानपत्र असे सन्मानाचे स्वरूप होते.

‘कोरोनासाठी लढताना महिला पोलीसांचे आणि नागरिकांचे उत्तम सहकार्य लाभत आहे. अशा प्रकारच्या सन्मानाने लॉकडाऊन सदृश्य काळात महिला पोलिसांचे मनोबल वाढण्यास मदत होणार आहे. पोलिसांच्या सहकार्यामुळे कोथरूडमधील परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यास आम्हाला यश मिळत आहे’, अशी प्रतिक्रिया पोलीस निरीक्षक बाळासाहेब बडे यांनी दिली.

_MPC_DIR_MPU_II

कधी सावित्री, जिजाऊ, अहिल्या, रमाई अशा विविध रूपात ‘कोविड वुमन वॉरियर’ बनून महिला पोलीस सतत कार्यरत असतात. आपल्या जीवाची पर्वा न करता सतत समाजहितासाठी कामगिरी करत असतात.

कोरोना काळात मोलाचा वाटा उचलणारे पोलीस पांडू नाही तर पांडुरंग आहेत, विटेवर नाही तर वाटेवर समाज रक्षणासाठी उभे आहेत, अशा पोलिसांना मनाचा मुजरा, असे मत गिरीश गुरनानी यांनी व्यक्त केले.

यावेळी गिरीश गुरनानी, अमोल गायकवाड, आकाश नागरे, रवि गाडे, सौरभ ससाणे उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.