Pune News: नगरसचिव निवृत्त होत असताना, 6 महिन्यांपूर्वीच प्रक्रिया करायला हवी होती; अंकुश काकडे यांची नाराजी

नगर सचिव हे अतिशय महत्त्वाचे पद आहे. त्या पदाला स्वतंत्र अधिकार आहेत. आता नवीन येणाऱ्या माणसाला कामकाजाची काही माहिती नसेल

एमपीसी न्यूज – पुणे महानगरपालिकेचे नगरसचिव दि.31 ऑगस्ट रोजी निवृत्त होत आहे. ही जागा महापालिकेला रिकामी ठेवता येत नाही. आता तात्पुरता पदभार इतर कोणाकडे तरी दिला जाईल. परंतु, दि. 31 ऑगस्ट 2000 रोजी नगरसचिव निवृत्त होत आहे, तर ती जागा भरण्याची प्रक्रिया किमान 6 महिन्यांपूर्वी सुरू होणे गरजेचे होते. परंतु, अद्याप महानगरपालिकेने ती प्रक्रिया सुरू केलेली नाही, अशा शब्दांत माजी महापौर अंकुश काकडे यांनी महापालिका आयुक्तांकडे नाराजी व्यक्त केली आहे.

नगर सचिव हे अतिशय महत्त्वाचे पद आहे. त्या पदाला स्वतंत्र अधिकार आहेत. आता नवीन येणाऱ्या माणसाला कामकाजाची काही माहिती नसेल आणि त्यामुळे महानगरपालिकेचा कारभार ठप्प होऊ शकतो, अशी भीतीही त्यांनी व्यक्त केली आहे.

याबाबतीत विद्यमान नगरसचिवांना मुदतवाढ देणे कायद्याने शक्य नाही. परंतु, कराराने काही मुदत आपण देऊ शकलो तर त्याचा आपण जरूर विचार करावा, अशी विनंतीही आयुक्तांना करण्यात आली आहे.

तर, महानगरपालिकेचे वरिष्ठ अधिकारी निवृत्त होण्याच्या तारखा निश्चित असतात. ही पदे भरण्यासाठी 6 महिन्यांपासून प्रक्रिया सुरू करणे गरजेचे आहे. दुर्दैवाने महापालिकेत अशी प्रक्रिया वेळेत सुरू केली जात नाही, ही वस्तुस्थिती आहे. आपल्या कारकीर्दीत भविष्य काळामध्ये निवृत्त होणारे अधिकारी यांच्या जागा भरण्यासाठी वेळेत प्रक्रिया सुरू कराल, अशी अपेक्षाही काकडे यांनी आयुक्तांकडे व्यक्त केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.