Pune News : शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादीकडून 12 डिसेंबरला व्हर्च्युअल रॅलीचे आयोजन

एमपीसी न्यूज : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या 80 व्या वाढदिवसानिमित्त राज्यभरात व्हर्च्युअल रॅलीचे आयोजन करण्यात आले तसेच या निमित्त पक्षाच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष व राज्याचे मंत्री जयंत पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.

पुण्यातील पत्रकार भवन येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेस पक्षाच्या राज्यसभा सदस्या अ‍ॅड. वंदना चव्हाण, प्रवक्ते अंकुश काकडे, शहराध्यक्ष आमदार चेतन तुपे, नगरसेवक दीपक मानकर आदी उपस्थित होते.

पाटील म्हणाले, पवार साहेबांचा 80 वाढदिवस 12 डिसेंबर रोजी पक्षाच्या वतीने राज्यभर साजरा केला जाणार आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पक्षाने पहिल्यांदाच व्हर्च्युअल रॅलीचे आयोजन केले आहे. ही रॅली राज्यातील 36 जिल्हे व 350 तालुक्यामध्ये आयोजित केली आहे.

तर मुख्य कार्यक्रम मुंबई येथील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठाणच्या सभागृहात मोजक्याच नेत्यांच्या उपस्थित होणार आहे. या कार्यक्रमाचे प्रक्षेपण रॅलीच्या माध्यमातून राज्यात दिसेल.

राष्ट्रवादीच्या वतीने तयार करण्यात आलेल्या संकेतस्थळाचे उद्घाटन करून सकाळी 11 वाजता कार्यक्रमाची सुरुवात होणार आहे. त्यानंतर डिजीटल टेक्नॉलॉजीद्वारे ऑनलाईन पद्धतीने पक्षाच्या सदस्य नोंदणीचा प्रारंभ केला जाणार आहे.

स्वतः शरद पवार हे सदस्यत्वाची पावती फाडून या उपक्रमाचा प्रारंभ करणार आहेत. याशिवाय त्या ठिकाणी निवडक तालुका आणि जिल्हा अध्यक्षांचा सत्कार केला जाणार आहे.

यावेळी वाढदिवसानिमित्त घेण्यात आलेल्या लघुपटाच्या स्पर्धेतील तीन स्पर्धकांचा सन्मान करून आदिवासी भागात पक्षाच्या वतीने देण्यात येणार्‍या वैद्यकीय कीटच्या वाटपाचा शुभारंभ केला जाणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.