Pune News: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुणे महापालिकेचा गलथान कारभार, राष्ट्रवादीचे आंदोलन

वैद्यकीय व प्रशासकीय अधिकारी, डॉक्टर आणि इतर कर्मचारी पीडित रूग्णांसाठी कसोशीने प्रयत्न करत असले तरी महापालिकेच्या नियोजनशून्य कारभारामुळे त्यांच्या प्रयत्नांना यश येत नाही हे वास्तव आहे.

एमपीसी न्यूज – पुणे शहरात कोरोनाचे संकट गंभीर झाले असताना महापालिकेच्या गलथान कारभारामुळे मोठ्या प्रमाणात मृत्यू होत आहेत. त्याच्या निषेधार्थ गुरुवारी राष्ट्रवादीतर्फे महापालिकेच्या आवारात आंदोलन करण्यात आले.

राज्यसभेच्या खासदार अ‍ॅड. वंदना चव्हाण, आमदार चेतन तुपे, विरोधी पक्षनेत्या दीपाली धुमाळ, माजी महापौर प्रशांत जगताप, नगरसेवक विशाल तांबे, नगरसेविका नंदा लोणकर, प्रिया गदादे पाटील, माजी नगरसेवक बाबा धुमाळ, विजय डाकले यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्ते आंदोलनात सहभागी झाले होते.

निवृत्त शास्त्रज्ञ डॉ. पी. लक्ष्मी नरसिंहन आणि आता पत्रकार पांडुरंग रायकर तसेच पुणे शहरातील अनेक नागरिकांना उपचारा संदर्भात, अ‍ॅम्ब्युलन्स संदर्भात येणाऱ्या अडचणीतून जीव गमवावा लागला आहे. तशीच घटना टीव्ही 9 चे पत्रकार पांडुरंग रायकर यांचा उपचाराच्या गलथान कारभारामुळे जीव गमवावा लागला आहे.

आधी टेस्टिंग बाबतीत होणारा हलगर्जीपणा, विलगीकरण कक्षांमधील गलथान कारभार तसेच खासगी हॉस्पिटलकडून होणारी लूट आणि आता जम्बो हॉस्पिटलमधील यंत्रणेतील निष्काळजीपणा हे सर्व पाहता पुणे हे कोरोनाच्या संकाटावर मात करण्यासाठी अपयशी ठरत असल्याचा आरोपही राष्ट्रवादीतर्फे आयुक्तांना दिलेल्या निवेदनात करण्यात आला आहे.

वैद्यकीय व प्रशासकीय अधिकारी, डॉक्टर आणि इतर कर्मचारी पीडित रूग्णांसाठी कसोशीने प्रयत्न करत असले तरी महापालिकेच्या नियोजनशून्य कारभारामुळे त्यांच्या प्रयत्नांना यश येत नाही हे वास्तव आहे. लोकप्रतिनिधींची मदत घ्या, असे प्रशासनाला सांगून देखील पूर्वीच्या आयुक्तांनी नगरसेवकांना विश्वासात घेतले नाही. याची फार मोठी किंमत शहराला मोजावी लागत आहे.

वारंवार पुणे शहरातील अ‍ॅम्ब्युलन्स संदर्भात, उपचार संदर्भात महानगरपालिका आयुक्त यांना निवेदन देऊन सुद्धा कोणत्याही प्रकारची उपाय योजना महानगरपालिकेकडून पुणेकरांसाठी होताना दिसत नाही. यामुळे यापुढे जर उपाययोजना अंमलात आल्या नाहीत, तर राष्ट्रवादी काँग्रेस पुणे शहरात रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही, यास सर्वस्वी जबाबदार पुणे मनपा असेल, असा इशाराही अ‍ॅड. वंदना चव्हाण, चेतन तुपे, दिपाली धुमाळ यांनी दिला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.