Pune News : प्रसिद्धीच्या हव्यासाचा राष्ट्रवादीच्या जगताप यांचा ‘पॅटर्न’ जुना : जगदीश मुळीक

एमपीसी न्यूज – राष्ट्रवादीला शहराध्यक्ष आहे हे त्यांची प्रसिद्धीपत्रक आल्यावर समजते. स्वतःची पक्षातच अशी केविलवाणी परिस्थिती असतांना जगताप यांनी भारतीय जनता पक्षाची काळजी करू नये, असा टोला भाजप शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांनी लगावला.

भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय पक्ष आहे. शहरातच नाही तर केंद्रात भाजपला जनतेने बहुमत मिळवून दिले आहे. आमचे पुणेकरांसोबत, देशाच्या जनतेसोबत नाते दृढ आहे. ‘आये-गये’ अशा कोणाच्याही बोलण्याने त्यात फरक पडत नाही. भारतीय जनता पक्ष, आमचे नेते – कार्यकर्ते आणि आमचे मतदारही विचारांसोबत बांधिलकी जपणारे आहेत. त्यामुळे नुसते पद मिळाले म्हणून आरोळ्या मारणाऱ्यांना आता जनता महत्व देणार नाही. हा आमचा पुणेकर जनतेच्या प्रेमावर आणि सुज्ञपणावर विश्वास आहे.

आज पीएमपीएमलचा पुळका आलेले हे महाभाग लॉकडाऊन लागले, गोरगरिबांचा आधार असलेली PMPML वाहतूक बंद होती तेव्हा झोपा काढत होते काय? म्हणून जनतेच्या काळजीचे ढोंग आता यांनी बंद करावे.

जगताप पुणे शहराचे महापौर होते, त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता पालिकेत होती. तेव्हा पुणेकरांच्या विकासाला प्राधान्य न देता, राष्ट्रीय नेत्यांचा अपमान करण्याच्या त्यांच्या चमकोगीरीला पुणेकरांनी तेव्हाही नाकारलंय.

स्वतःचे महत्व टिकविण्यासाठी म्हणून जनतेत लोकप्रिय असणाऱ्या नेत्यांवर टीका करून प्रसिद्धी मिळवायचा जगताप यांचा ‘पॅटर्न’ आता जुना झालाय. त्यांनी नवं काहीतरी शोधून काढावे. प्रसिद्धीच्या मागे धावण्यापेक्षा जनतेसाठी काम करावे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.