Pune News : प्रशासनाविरोधात भाजपच्या दादागिरीचा राष्ट्रवादी काँग्रेसकडून निषेध

एमपीसी न्यूज – पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपी) संचालकपदाचा राजीनामा दिलेल्या शंकर पवार यांना बैठकीस उपस्थित राहण्यास मनाई केल्याने महापौर मुरलीधर मोहोळ आणि इतर पदाधिकाऱ्यांनी शुक्रवारी ‘पीएमपी’चे अध्यक्ष राजेंद्र जगताप यांच्या कार्यालयात घुसून संगणकात छेडछाड केली.

राजेंद्र जगताप यांच्या अनुपस्थितीत होणारी ही छेडछाड थांबविण्याचा प्रयत्न करणाऱ्या ‘पीएमपी’च्या कर्मचाऱ्यांना महापौर व इतरांकडून कार्यालयाची तोडफोड करण्याची धमकीही देण्यात आली. शिवाय, राजेंद्र जगताप यांच्यावर खोटा गुन्हा दाखल करण्याचे प्रयत्न भाजपकडून सुरू आहेत. पुण्यनगरीचे प्रथम नागरिक असलेल्या महापौरांची ही कृती निश्चितच निषेधार्ह असून, या पदाला शोभणारी नाही. महापौरांच्या या कृतीचे राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने निषेध करण्यात येत आहे.

शंकर पवार यांच्या राजीनाम्यानंतर महानगरपालिकेतील सत्ताधारी भाजपमधील अंतर्गत धुसफूस चव्हाट्यावर आली आहे. पक्षांतर्गत मतभेद चव्हाट्यावर आल्याने बिथरलेल्या भाजपकडून याबाबतचे पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहेत. त्यानुसार, नियमानुसार आपल्या भूमिकेवर ठाम राहिलेले राजेंद्र जगताप यांच्याबाबतचा राग मनात धरून त्यांच्या कार्यालयात घुसून संगणकाची छेडछाड करण्यात आली. भाजपच्या या दादागिरीची ऑडिओ क्लिप उपलब्ध असून, तो आम्ही पुरावा म्हणून सादर करीत आहोत.

महापौरांची ही कृती निषेधार्ह असून, या पदाला शोभणारी नाही. केवळ आपल्या म्हणण्याप्रमाणे एखादी कृती होत नाही, याचा राग मनात धरून अधिकाऱ्यांप्रति असे वागणे योग्य नाही. भाजप आपल्या दादागिरीने एका चांगल्या अधिकाऱ्याचा बळी देऊ पाहात आहे. राजेंद्र जगताप यांनी आतापर्यंत पुण्यात विविध विभागांत काम केले असून, त्यांची पारदर्शक कारकीर्द पुणेकरांना माहीत आहे. सूज्ञ पुणेकर नागरिक हे कदापि खपवून घेणार नाहीत. राष्ट्रवादी काँग्रेसही भाजपच्या या दादागिरीचा आणि महापौरांच्या कृतीचा निषेध करत असून, त्यांचा हा डाव आम्ही हाणून पाडल्याशिवाय राहणार नाही…

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.