Pune News : गरज एक पॅथॉलॉजिस्टची आणि भरती तीन पदांची

एमपीसी न्यूज – प्रयोगशाळेत एका पॅथॉलॉजिस्टची गरज असताना तीन पदे भरण्याचा घाट महापालिका प्रशासनाने घातला आहे. हा निर्णय दुर्दैवी आणि पुणेकरांचा कररुपी पैशाचा अनावश्यक वापर करणारा आहे. त्यामुळे हा निर्णय रद्द करावा, अशी मागणी सजग नागरिक मंचाचे विवेक वेलणकर यांनी केली आहे.

महापालिकेने तीन वर्षांपूर्वी शहरातील महापालिका दवाखाने, हॉस्पिटल्समधील पॅथॉलॉजिच्या सर्व तपासण्या क्रस्ना डायग्नोस्टीक्स या संस्थेकडे 10 वर्षांसाठी वर्ग केल्या आहेत. महापालिका हद्दीत केवळ गाडीखाना येथील महापालिका स्वतः प्रयोगशाळा चालवते. त्याठिकाणी आत्ताही एक वर्ग 1 दर्जाचा पॅथॉलॉजिस्ट आहे. ज्यांना निवृत्त व्हायला अजून दोन वर्षे आहेत.

पॅथॉलॉजी विभागाने आऊटसोर्स करण्याआधी महापालिकेकडे पॅथॉलॉजिस्टची सहा पदे मंजूर होती. त्यातील तीन पदे भरली गेली. मात्र आता बदललेल्या परिस्थितीत तीन वर्ग एकचे पॅथॉलॉजिस्टची गरज आहे का ? हे न पाहताच पुन्हा पदे भरती केली जात आहेत. या पदांची अशी गरज गाडीखान्यातील प्रयोगशाळेत असल्याचे सांगितले जात आहे.

यासंदर्भात माहिती अधिकार दिनाच्या माध्यमातून तेथे केवळ एका पदाची गरज असल्याचे स्पष्ट झाले आहे. असे असताना कारण नसताना तीन पदांची भरती केली जात आहे. हा नागरीकांच्या करांच्या पैशांचा अपव्यय आहे. त्यामुळे एक पॅथॉलॉजिस्टचे पद भरण्यास परवानगी द्यावी,  आणि ज्यांनी अकारण तीन पोस्ट भरण्याचा निर्णय घेतला त्यांची चौकशी करून कारवाई करावी, अशी मागणी वेलणकर यांनी महापालिका आयुक्तांकडे केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.