Pune News : काँग्रेस आणि सोनिया गांधी यांच्याविषयीचे गैरसमज दूर करण्याची गरज – पृथ्वीराज चव्हाण

एमपीसी न्यूज – ‘काँग्रेसची विकासाची विचारधारा, परंपरा पुढे नेण्याचे काम सोनियाजीनी केले. सामान्य कार्यकर्त्यांवर विश्वास टाकून काम करण्याची संधी देण्याचा त्यांचा स्वभाव आहे. काँग्रेस आणि सोनिया गांधींबाबतचे गैरसमज दूर करण्याची गरज आहे,’ असे प्रतिपादन राज्याचे माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी नुकतेच पुण्यात केले.

काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षा खासदार सोनिया गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित सेवा-कर्तव्य-त्याग सप्ताहात कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण होते, त्यावेळी चव्हाण बोलत होते. यावेळी खासदार कुमार केतकर, काँग्रेसच्या महाराष्ट्र सह-प्रभारी सोनलबेन पटेल, संयोजक माजी आमदार मोहन जोशी, शहराध्यक्ष रमेश बागवे, प्रदेश कमिटीचे संजय बालगुडे, वीरेंद्र किराड, माजी आमदार दीप्ती चवधरी, माजी महापौर कमल व्यवहारे, नगरसेवक अजित दरेकर, सुजाता शेट्टी, रफिक शेख, शेखर कपोते, प्रशांत सुरसे, चेतन अग्रवाल आदी उपस्थित होते.

’70 वर्ष आणि 7 वर्ष’ हा व्याख्यानाचा विषय होता. पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, ‘सोनियजींबद्दल अनेकदा गैरसमज पसरवले जातात. मात्र, त्यांनी कधीही आपली मते लादली नाहीत. पंतप्रधान पदाचा कटाक्षाने त्यांनी सन्मान ठेवला. युपीए आणि मनमोहन सिंग सरकार उभारणीत सोनिया गांधी यांचे मोलाचे योगदान होते. मात्र, त्यांनी कधीही सरकारच्या कामात हस्तक्षेप केला नाही. मोदींनी निर्णयप्रक्रियेत एकाधिकारशाही आणली आहे. सात वर्षात सत्तर वर्षाच्या भरीव कामाची वाट लावणाऱ्या या मोदी सरकारला सत्तेपासून दूर करण्याची गरज आहे.’

कुमार केतकर म्हणाले, ‘भारतीय राज्यघटना देशाला समर्पित करत काँग्रेसने लोकशाही रुजवण्याचे काम केले. भविष्याचा वेध घेत नेहरूंनी अर्थव्यवस्थेला प्रगतीपथावर घेऊन जाणारे निर्णय घेतले. बँकांचे राष्ट्रीयीकरण, लोकांना स्वतःच्या पायावर उभे करण्यासाठी राबवलेल्या योजना, विविध शैक्षणिक-संशोधन, सामाजिक व सांस्कृतिक संस्थांची उभारणी या काळात झाली. आज या सर्व संस्थांचा, काँग्रेसच्या काळात झालेल्या विकासाचा लाभ घेत मोदी आणि त्यांच्या सरकारमधील लोक ‘काँग्रेसने सत्तर वर्षात काय केले?’ हा प्रश्न बालिशपणे विचारत आहेत. गांधी-नेहरू कुटुंबावर घराणेशाहीचा आरोप करताना त्यांचा त्याग ही मंडळी विसरतात, हे दुर्दैव आहे.’

‘नियोजन आयोग बरखास्त करणे, सरकारी संस्थांचे खासगीकरण करणे, नोटबंदीसारखा निर्णय लादणे अशा कितीतरी विध्वंसक गोष्टी या सात वर्षात झाल्या आहेत. इतिहास आणि भूगोल या दोन्हीचा अभाव असलेले मोदी आज गांधींना चांगले म्हणतात, तर नेहरूंवर टीका करतात. हा दुटप्पीपणा 2024 नंतर कदाचित संपले आणि ते गांधींवरही टीका सुरु करतील. 2014 मध्ये भ्रष्टाचाराविरोधात आंदोलन करणारे अण्णा हजारे आज झोपले आहेत, अरविंद केजरीवाल यांना जनलोकपालचा विसर पडला आहे,’ असेही केतकर यांनी नमूद केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजय बालगुडे यांनी केले. आभार प्रवीण करपे यांनी मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.